Maharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून राज्यात कमाल आणि किमान तापमानात प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. पावसानं राज्यातून माघार घेण्यास सुरुवात केली असली तरीही अद्याप तो पूर्णपणे परतला नाही, अशीच स्थिती आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार राज्यात हीच स्थिती कायम राहिल्यास पुढील काही दिवस महाराष्ट्रात बेभरवशाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबईत आकाश अंशत: ढगाळ आणि बहुतांशी निरभ्र असेल, तर पावसाची एखादी सरही हजेरी लावून जाईल. यादरम्यान, शहरातील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 आणि 26 अंश इतकं राहील.
पावसानं माघार घेण्यास सुरुवात केल्यामुळं आता सर्वदूर सातत्यानं होणाऱ्या हवामान बदलांची नोंद करण्यात येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसह सध्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. तर, विदर्भ आणि कोकणातही पारा 36 अंशांपलिकडे गेल्यामुळं ऑक्टोबर हिटचा दाह दिवसागणिक आणखी तीव्र होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
देश स्तरावर हवामानाची स्थिती पाहायची झाल्यास, लक्षद्वीप बेटसमुहापासून अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून 5.8 किमी अंतरावर चक्राकार वारे निर्माण झाले असून, तामिळनाडूच्या उत्तरेपासून लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्यामुळं पावसाचा शिडकावा होण्यासाठी पूरक वातावरण निर्माण होणार आहे.