Maharashtra Weather News : मान्सूनच्या वाऱ्यांनी महाराष्ट्रातून माघार घेतल्यामुळं आता राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ होताना दिसत आहे. दरम्यानच्या काळात पावसाचा शिडकावासुद्धा होताना पाहायला मिळत आहे. पण, हा मान्सून नसून, अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यासह चक्राकार वाऱ्यांचा परिणाम असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यानच्या काळात एका चक्रिवादळाची निर्मितीसुद्धा होत असल्यामुळं सध्या हवामान विभागाच्या चिंतेत भर पडल्याचं पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार 23 ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरात 'दाना' या चक्रीवादळाची निर्मिती होणार असून, बुधवारी या वादळाची तीव्रता वाढणार आहे. चक्राकार वारे आणखी तीव्र होणार असून, त्याचं वादळात रुपांतर होणार असल्यामुळं या वादळाची दिशा ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दिशेनं झुकणारी असेल. ज्यामुळं महाराष्ट्राला या वादळाचा थेट धोका नसेल असं हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच 23 ऑक्टोबरपर्यंत बंगालच्या उपसागरात पूर्व मध्य भागामध्ये चक्रीवादळाची निर्मिती होणार असून, पुढे हे वादळ उत्तर पश्चिमेला जाणार असून, 24 ऑक्टोबरपर्यंत ओडिशाच्या किनारपट्टीवरून बंगालच्याच उपसागरात वायव्येला जाणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं ओडिशा आणि पश्चिम बंगाल या भागांमधील अतिवृष्टीचा अंदाज वगळता इतर राज्यांवर या वादळाचे थेट परिणाम होणार नाहीत हे स्पष्ट होत आहे.
मान्सूननंतर होणाऱ्या पावसानं अद्याप मुंबईकरांची पाठ सोडली नसून, पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहरात पावसाची तुरळक हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, 26 ते 29 ऑक्टोबरदरम्यान सातारा, सांगली आणि पुण्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर इथं वातावरण बहुतांशी ढगाळ राहण्याची शक्यता आहे.