Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्यानं चढ उतार होत असून, या बदलांचे थेट परिणाम नागरिकांवरही होताना दिसत आहेत. कोकण (Konkan) आणि नजीकच्या भागांमध्ये झालेला पाऊस आणि त्यानंतर असणारं ढगाळ वातावरण पाहता मुंबईपर्यंत याचे परिणाम दिसून आले. तर, विदर्भात उष्णतेची लाट येऊनही पावसाच्या सरींनी मात्र निरोप घेतला नसल्याचच आता स्पष्ट झालं आहे. हवामान विभागानं ही प्रणाली पाहता राज्याच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही वादळी पाऊस आणि गारपीटीचा यलो अलर्ट दिला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30 -40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
कोकणातील एकाकी भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची दाट शक्यता आहे pic.twitter.com/iLxNcjpNxc— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 22, 2024
हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, नागपूर, यवतमाळमध्ये गारपीटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात सध्या मराठवाडा ते विदर्भ पट्ट्यामध्ये चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण होत असून, छत्तीसगढपासून केरळच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत सक्रिय असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं हे परिणाम दिसत असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सरासरी तापमान 40 अंशांच्या घरात असून, काही भागांमध्ये 4 अंशांची वाढ नोंदवली जात आहे.
पुणे- 37.8 अंश
सातारा - 38.7 अंश
कोल्हापूर- 37 अंश
नाशिक - 36 अंश
रत्नागिरी - 34.5 अंश
अमरावती - 41.4 अंश
नागपूर - 40.1 अंश
वाशिम, अकोला, गडचिरोली - 42 अंश