Weather News : राज्यात थंडी शेवटच्या टप्प्यात; उन्हाच्या झळा तीव्र होऊन वीकेंडला होणार जीवाची काहिली

Maharashtra Weather news : राज्यातील तापमानामध्ये आता लक्षवेधी बदल होणार असून, थंडी शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचं स्पष्ट होत आहे.   

सायली पाटील | Updated: Mar 8, 2024, 07:57 AM IST
Weather News : राज्यात थंडी शेवटच्या टप्प्यात; उन्हाच्या झळा तीव्र होऊन वीकेंडला होणार जीवाची काहिली  title=
Maharashtra Weather news Summer waves strike as winter sets off in state know latets update

Maharashtra Weather news : थंडीनं काढता पाय घेतला असं म्हटलं जात असतानाच राज्यात अचानक तापमान कमी झालं आणि हिवाळ्याचा मुक्काम वाढला. आता मात्र मोठ्या मुक्कामी असणारी हीच थंडी शेवटच्या टप्प्यात आली असून, तिनं आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आता तामपानात वाढ होत असून, किनारपट्टी भागांमध्येही हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढताना दिसत आहे. परिणामी उन्हाची तीव्रता अपेक्षेहून जास्त जाणवू लागली आहे. 

मागील पंधरा दिवसांचा आढावा घ्यायचा झाल्यास अवकाळी आणि त्यातच झालेल्या गारपीटीमुळं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हवामानात सातत्यानं काही बदल दिसून आले. त्यातच दुपारच्या वेळी उन्हाचा दाह अधिक जाणवू लागला. सध्या राज्यात वाशिम येथे 38 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. तर, बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 35 अंशांहून अधिकच असल्याचं पाहायला मिळालं. 

विदर्भापासून कर्नाटकापर्यंत सक्रिय असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्याच्या अनेक भागांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. पण, तरीही उकाडा मात्र जीवाची काहिली करणार हे नाकारता येत नाही. सध्या कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्येही उन्हाळा आणखी तीव्र होत असल्यामुळं दुपारच्या वेळी काम नसल्यास घराबाहेर न पडण्याचा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : Mahashivratri 2024 Video : महाशिवरात्रीनिमित्त महाकालेश्वर मंदिरात पार पडली खास आरती; पाहा गर्भगृहातील भारावणारे क्षण 

आठवडी सुट्टी आणि जोडून आलेल्या रजा असा लांबलचक बेत आखत कुटुंबासह भटकंतीसाठी जाण्याचा बेत आखत असाल, तर उन्हाचा मारा सोसण्याच्या तयारीनिशी बाहेर पडा, कारण येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक सूर्यनारायणाचा प्रकोप आणखी वाढतच जाणार आहे. कारण, आता प्रत्यक्षात राज्यात उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे.