Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानात मोठे बदल अपेक्षित असून, पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. एकिकडे मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही रात्रीपासून पहाटेपर्यंतच्या तापमानाच घट नोंदवली जात असतानाच दुसरीकडे मात्र पावसाच्या हजेरीनं हवामान विभागाचंही लक्ष वेधलं आहे.
गुरुवारपासून राज्याच्या दक्षिण महाराष्ट्र भागापासून कोकणासह मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस ही स्थिती कायम राहिल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या आंध्र प्रदेश आणि तामिनाडू क्षेत्रावर सध्या कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होताना दिसत आहे. परिणामस्वरुप दाक्षिणात्य किनारपट्टी क्षेत्रामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिणेकडे पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असतानाच समुद्रावरून य़ेणारं बाष्प दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात स्थिरावत असून, त्यामुळं इथं ढगाळ वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. या स्थितीमुळं राज्याच्या सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, आणि पुणे जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एकिकडे राज्यात ताशी 30 ते 40 किमी वेगानं वाहणारे वारे आणि पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच दुसरीकडे राज्यातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे ही बाबसुद्धा नाकारता येत नाही. येत्या 48 तासांमध्ये महाबळेश्वर, नांदेड, अहनदनगर, नाशिक, परभणी, छत्रपती संभाजीनगर इथं तापमानात काही अंशांची घट नोंदवली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.