Weather News : देशभरातील हवामानाचा आढावा घेतला असता सध्या बहुतांश भागांवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, त्याचा एक भाग बिहारच्या उत्तरेपासून हिमालयाच्या पश्चिम बंगाल क्षेत्राक़डे सक्रिय आहे, तर दुसरा भाग आसामपासून नागालँडपर्यंत परिणाम करताना दिसत आहे. केरळ आणि लक्षद्वीप येथे पावसाची रिमझिम सुरु असून, पर्वतीय क्षेत्र असणाऱ्या काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मात्र हिमवृष्टी सुरु आहे. दिल्लीपर्यय याचे परिणाम दिसत असून, तापमानात काही अंशांची घट नोंदवण्यात आली आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार देशाच्या तामिळनाडू, बिहार आणि पश्चिम बंगालच्या काही भागात उष्णतेची लाट अडचणी आणखी वाढवताना दिसणार आहे. येत्या काळात देशात उष्णतेच्या भीषण पर्वाची सुरुवात होणार असल्याचा थेट इशारा देत हवामान विभागानं तापमान 44 ते 47 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. 3 ते 6 मे पर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण रात्रींचा इशारा देण्यात आपला आहे. त्याशिवाय गंगेच्या किनारी क्षेत्रांमनध्येही लक्षणीय तापमानवाढीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवत नागरिकांना सतर्क केलं आहे.
कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे. pic.twitter.com/KWFYTxIJQd— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 2, 2024
मागील काही दिवसांपासून राज्यावर असणारी ढगांची चादर आता दूर होताना दिसत असून राज्यात उन्हाचा तडाखा बसताना दिसत आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुपारच्या वेळी तापमान उच्चांकी आकडा गाठताना दिसत असून, कोकणापर्यंत त्याचे परिणाम दिसणार आहेत. कोकण किनारपट्टी क्षेत्रही या उष्ण- दमट वातावरणास अपवाद ठरलं नसून, समुद्रावरून येणारे उष्ण वारे अडचणी वाढवताना दिसणार आहेत.
राज्यातील हवामानाची स्थिती पाहता ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड आणि सोलापूरात उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी या पार्श्वभूमीवर काळजी घेत उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्राथमिक उपाययोजनांचा अवलंब करावा असं आवाहन प्रशासकिय आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, पुढील 24 तासांमध्ये देशाच्या अरुणाचल प्रदेश आणि नजीकच्या भागांमध्ये अंशत: हिमवृष्टीची शक्यता असून, हिमालयाच्या पश्चिम क्षेत्रांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, अतीव पर्वतीय भागांमध्ये पुढील 5 दिवस वातावरणात सातत्यानं बदल अपेक्षित असल्याचा इशारा देण्यात आला आहे.