Maharashtra Weather News : पावसाचा निर्धारित काळ अर्थात जून ते सप्टेंबरचा कालावधी आता अवघ्या काही दिवसांनी अंतिम टप्प्यात पोहोचणार असून, आता या पावसाची भेट थेट पुढच्या वर्षी असंच अनेकांना वाटत आहे. पण, हा पाऊस इतक्यात पाठ सोडणार नसल्याचं आता स्पष्ट होत आहे. एकिकडे पावसानं अधूनमधून उघडीप दिली असली तरीही दुसरीकडे मात्र कोकणासह मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागासह मध्य महाराष्ट्राची पाठ मात्र पावसानं सोडलेली नाही.
मुंबई शहस आणि उपनगरामध्ये पहाटेची वेळ वगळता संपूर्ण दिवस उष्षणतेचा दाह अधिकच वाढताना दिसत आहे. त्यातच समुद्रावरून वाहत येणाऱ्या वाऱ्यांमुळं उकाडा अधिकच तीव्रतेनं जाणवू लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशत: ढगाळ असेल, तर अधूमधून पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. यादरम्यान किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 32 आणि 26 अंशांच्या घरात असेल.
विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान पावसाचा जोर मात्र तुलनेनं ओसरताना दिसेल ही बाबही नाकारता येत नाही.
मागील काही वर्षांचा आढावा घ्यायचा झाल्यास मान्सूनच्या परतीची तारीख दरवर्षी लांबणीवर पडताना दिसत आहे. यंदाची परिस्थिती अशीच असून, अद्यापही उत्तराखंड, पंजाब, राजस्थानमधून पावसाच्या परतीसाठी पूरक वातावरण नाही. वायव्य भारतातून मात्र पावसानं परतीचा प्रवास सुरू केल्या असून, ही प्रक्रिया आणखी वेग धारण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मागील वर्षाचा आढावा घ्यायचा झाल्यास 25 सप्टेंबर रोजी पावसानं परतीचा प्रवास सुरू केला होता. ज्यानंतर संपूर्ण भारतातून मान्सूननं 6 ऑक्टोबरपर्यंत माघार घेतली होती, आता यंदा हा मान्सून परतीच्या प्रवासाला खरीखुरी सुरुवात केव्हा करतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.