Maharashtra Weather News : अद्याप मार्च महिना संपलाही नाही, तोच राज्यात उन्हाचा दाह आणखी तीव्र होताना दिसत आहेत. दर दिवसागणिक मुंबई, ठाणे आणि पालघरसह अलिबाग आणि कोकण किनारपट्टी भागांमध्ये हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अधिक राहिल्यानं उष्णता त्रासदायक ठरत आहे. मार्च महिन्यातच ही परिस्थिती, तर मे आणि संपूर्ण जून महिन्यामध्ये नेमकी काय अवस्था होणार हीच चिंता आता अनेकांना भेडसावू लागली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत आता दुपारप्रमाणंच सायंकाळी आणि पहाटेच्या वेळीसुद्धा शहरात प्रचंड उकाडा जाणवणार आहे. तर, तापमानाचा आकडा 40 ते अगदी 42 अंशांच्या घरात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 48 तास हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याचे संकेतही हवामान विभागानं दिले आहेत.
देशात सध्या सक्रिय असणाऱ्या हवामान प्रणालीनुसार पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशच्या उत्तर किनाऱ्यापासून तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर, कर्नाटकमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्यामुळे तापमानात चढ-उतार आणि काही ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. तर, कुठं पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे.
मागील 48 तासांपासून विदर्भ आणि मराठवाडा भागामध्ये अवकाळीनं थैमान घातलं असून अनेक भागांना गारपीटीचा तडाखाही बसला आहे. उन्हाचा दाह दिवसागणिक वाढत असल्यामुळं इथं परिस्थिती आणखी बिघडू शकते असा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळं उकाडा अपेक्षेहून जास्त प्रमाणत जाणवण्याचे संकेतही हवामान विभागानं दिले आहेत.
हवामान विभागाने पुढील तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पाऊस आणि गारपीटीचा अंदाज व्यक्त केला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून या भागामध्ये पाऊस पडत आहे.