Maharashtra Weather News : तिथं गुजरातमध्ये हवामानाची परिस्थिती बदलत असतानाच इथं महाराष्ट्रात पावसानं कुठे उसंत दिली आहे, तर कुठे थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं उसंत दिली असतानाच काही भागांमध्ये मात्र पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असून, इथं पाऊस पुन्हा जोर धरताना दिसत आहे. पुढील 24 तासांसाठी राज्याच्या गडचिरोली, चंद्रपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, मराठवाडा आणि कोकणातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्याच्या घडीला कमी दाबाचा पट्टा गुजरातपासून उदयपूर, सिधी, अंबिकापूर, पूरी आणि बंगालच्या उपसागरासापर्यंत सक्रिय असून, केरळच्या मध्यापासून दक्षिण गुजरातपर्यंतही कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे इथं पावसाचा जोर वाढलेला असतानाच काही भागांमध्ये मात्र तापमावाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे.
हवामानाच्या या स्थितीचे परिणाम मुंबईपर्यंत पाहायला मिळत असून, शहरावर ढगांची चादर पाहायला मिळत आहे. ज्यामुळं पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी ढगाळ आकाश आणि पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपातील सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र शहरातील तापमानाचा आकडा चढत्या क्रमातच दिसणार असून, त्यामुळं नागरिकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तिथं कोकणात पावसानं उसंत घेतली असली तरीही पुढील काही दिवसांमध्ये हाच पाऊस दुप्पट ताकदीनं या भागांना ओलाचिंब करताना दिसेल. त्यामुळ पावसानं अद्याप निरोप घेतलेला नाही हेच खरं.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/CEeooLKQmI
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 29, 2024
मागील काही दिवसांपासून गुजरातमध्ये हवामानानं धारण केलेल्या रौद्र रुपामुळं अनेक अडचणींनी डोकं वर काढलं. जवळपसा 80 वर्षांमध्ये अशी चौथी वेळ येत आहे, जिथं समुद्रात घोंगावणाऱ्या वादळामुळं गुजरातला तडाखा बसत आहे. अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळं गुजरातमध्ये हवामानानं हे रौद्र रुप धारण केलं असून, येत्या काही तासात हे वारे चक्रीवादळाचं रुप धारण करताना दिसणार आहेत. गुजरातच्या भुजपासून 60 किमी वायव्य दिशेला नालियापासून 80 किमी ईशान्येकडे ही प्रणाली सक्रिय असून, पुढील 24 तासांमध्ये सौराष्ट्रनजीकच्या अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याचे संकेत हवामान विभागानं दिले आहेत.