Sharad Pawar In Markadwadi Over EVM Issue: विधानसभेच्या निकालानंतर इलेक्ट्रीक मतदार यंत्र अर्थात ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या माळशिरस तालुक्यातील मारकरवाडी गावाला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान शरद पवारांनी या गावातील गावकऱ्यांचं त्यांच्या भूमिकेसाठी कौतुक केलं. तसेच यावेळेस दिलेल्या भाषणात पवारांनी ईव्हीएमसंदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी काय करता येईल याबद्दल भाष्य केलं आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा समोर चैत्यभूमी वरून आणलेल्या मेणबत्त्या प्रज्वलित केल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. "एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सबंध देशांमध्ये ज्याची चर्चा चालू आहे त्या प्रश्नासाठी आज आपण या ठिकाणी आलो आहोत. मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही संबंध देशाला जागं केलं. लोकसभेत मोहिते-पाटील, राज्यसभेत मी आहे. दोन-तीन दिवस बघतोय तिथे खासदार आम्हाला भेटतात ते दुसरी कुठली चर्चा करत नाहीत तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात मारकडवाडी गाव आहे कुठे?" असं म्हणत पवारांनी मारकडवाडीकऱ्यांचं कौतुक केलं. "देश तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतोय त्याचा आम्हाला आनंद आहे," असंही पवार म्हणाले.
"हे सगळं परवा झालेल्या विधानसभेची निवडणुकीमुळे घडलं. निवडणुकीचे निकाल लागतात, लोक निवडून येतात, काहींचा पराभव होतो काही तक्रार येतात नाही असं नाही. देशाला, राज्याला निवडणुकीसंबंधीची आस्था असताना त्यांच्या मनात शंका का? आता आपण ईव्हीएमद्वारे मतदान घेतले पण काही निकाल असे आले त्यामुळे तुमच्या मनात शंका आली. एकट्या तुमच्या मनात नाही एक लोकांच्या मनात शंका आहे. त्या रास्त आहेत. यात दुरुस्ती केली पाहिजे. जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे, ही भावना लोकांच्या मनात तयार झाली आहे. जगातला मोठा देश असलेल्या अमेरिकेत मतं पेटीत टाकली जातात. इंग्लंडमध्ये मते पेटीत टाकतात. अमेरिकेसहीत काही देशांनी एकेककाळी ईव्हीएमचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला आता हे ईव्हीएम नको. काय असेल ते पेटीत टाकायचं मत असाच अधिकार दिला पाहिजे. मग आपलाच हट्ट का? आपल्याकडे शंका आली त्या शंकाचं निरसन झालं पाहिजे," असंही शरद पवार म्हणाले.
"आता जयंत पाटलांनी काही आकडेवारी सांगितली. आम्ही काय माहिती गोळा केली. त्या माहितीमध्ये दिसते की काही लोकांनी मतदान केलं पण किती मतांनी लोक निवडून आले याची आकडे या मतदानासारखी नाही. त्यामुळे साहजिक लोकांच्या मनात ही शंका तयार झाली आहे. ही शंका घालवायची असेल तर काय करता येईल? आता देशामध्ये निवडणूक पद्धत स्वीकारली आहे त्यामध्ये बदल केला पाहिजे. त्याबद्दलची जागृती मारकडवाडी गावातील लोकांनी केली. मी इथे यायचं ठरवलं त्याचं कारण म्हणजे, तुमचं मतदान झाल्यानंतर आपल्या गावात फेरमतदान आपण घेऊ हे जे ठरलं ते अधिकृत नव्हतं, सरकारी नव्हतं तर तुम्ही गावाने बसून ठरवलं. हा तुमचा अधिकार होता. हा निकाल तुम्ही घेतल्यानंतर पोलिसांनी येथे बंदी का केली? कोणत्या कायद्याने बंदी केली?" असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.
"आज मी जे भाषण करतोय तुम्ही ऐकताय. पोलिसांनी इथे निर्णय घेतला की मी बोलायचं नाही तर तुम्ही ऐकायचं नाही. मग इथे काय होईल? असा कुठे कायदा आहे तुम्ही का जमायचं नाही? तुमच्याच गावात जमायचं नाही? ही जमावबंदी गंमतीची गोष्ट आहे," असा टोला शरद पवारांनी लगावला. "तुम्ही पुन्हा तुमच्या समाधानासाठी मतदान करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते? तुम्हीही केलं म्हणून तुमच्यावर खटले भरले मला काही समजत नाही," असंही पवार म्हणाले.
"गावाने ठरवलं वेगळा दिशेने जायचं त्यासाठी खटला? जानकर यांनी सगळ्या घडलेल्या घटनांच्या गोष्टी आमच्याकडे द्या महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे. त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ. मुख्यमंत्र्याकडे देऊ. पंतप्रधानाकडे देऊ. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देऊ. काळ सोकावला आहे. सध्या काळ सोकावला की तुमच्या अधिकारावर संकट येतं. आम्हाला ईव्हीएमवर मतदान नको जुन्या पद्धतीने मतदान द्या असे ठराव तुम्ही द्या," असं शरद पवार म्हणाले. असा ठराव अगदी केंद्रापासून, राज्य सरकारपासून निवडणूक आयोगापर्यंत देऊन ईव्हीएमसंदर्भातील आहे ती शंका दूर करता येईल असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.