'विधान परिषदेत भाजप फासे टाकणार, आमदारांची पळवापळवी होण्याची महाविकास आघाडीला भीती'

Maharashtra Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला मतदान होत आहे. विशेष म्हणजे हे गुप्त मतदान असल्यामुळे भाजपकडून आमदारांची पळवापळवी होण्याची भीती महाविकास आघाडीला आहे.  

Updated: Jun 18, 2022, 09:42 AM IST
'विधान परिषदेत भाजप फासे टाकणार, आमदारांची पळवापळवी होण्याची महाविकास आघाडीला भीती'   title=

मुंबई : Maharashtra Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला मतदान होत आहे. विशेष म्हणजे हे गुप्त मतदान असल्यामुळे भाजपकडून आमदारांची पळवापळवी होण्याची भीती महाविकास आघाडीला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांनी आपल्या आमदारांवर बारीक नजर ठेवायला सुरुवात केली आहे. ते कोणाच्या संपर्कात आहेत, याची माहिती गुप्तपणे घेतली जात आहे.

शिवसेनेच्या आमदारांना तर माध्यमांशी बोलण्यासही मनाई करण्यात आली. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या गळाला लागू शकतात, अशी शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीतच काही आमदार क्रॉस व्होटिंग करतील,अशी भीती होती. मात्र तसे झालं नाही. आता तेव्हा ज्यांच्यावर संशय होता, ते रडारवर आहेत. 

 राज्यसभा निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा दगाफटका बसल्याने सत्ताधारी सावध झाले आहेत. आघाडी सरकारकडे (Mahavikas Aghadi) मतांचा कोटा असताना शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाचा सामना पत्करावा लागला. त्यामुळे आता विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. 

विधानपरिषद निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आपल्या आमदारांना पवईतील रेनेसॉ हॉटेलमध्ये ठेवले आहे. तर काँग्रेसनेही आपल्या आमदारांना तातडीने मुंबईत बोलावून घेतले आहे. तर भाजपनेही खबरदारी घेत हॉटेलवर आमदारांना ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  राज्यसभा निवडणुकीत झालेल्या एका जागेच्या पराभवामुळे शिवसेनेनं यावेळी सावध पवित्रा घेतला आहे. रात्री उशिरा शिवसेनेचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हेही हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपनेही आपल्या आमदारांची काळजी घेतली आहे. प्रत्येक आमदारांवर पाळत असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता आहे.

विधानपरिषदेची निवडणूक दोन दिवसांवर आली असून त्यामुळे राज्यातील राजकारणाची चक्रं वेगाने फिरत आहेत. शिवसेना आमदारांना कालपासून पवईच्या हॉटेल रेनेसॉ मध्ये  थांबवण्यात आलं आहे तर भाजपचे आमदार हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे मुक्कामी आहेत. आज संध्याकाळी 5 भाजपा आमदारांची बैठक होणार आहे. तर काँग्रेसच्या आमदारांना आज दुपारपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आलेत. फोर सिजन हॉटेलमध्ये काँग्रेस आमदारांची राहण्याची व्यवस्था होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता फोर सिजन हॉटेल मध्ये काँग्रेसची बैठक होणार असल्याची माहिती आहे.

विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी मतदान असल्याने यावेळी कोणता पक्ष बाजी मारतो याची मोठी उत्सुकता आहे. भाजपने आम्ही सगळ्या जागा जिंकणार असा दावा केला आहे. आम्ही आता दुसरी व्युहरचना आखली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चमत्काराची भाषा भाजपकडून करण्यात आली आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारनेही काळजी घेत विजयाचा दावा केला आहे.