महाराष्ट्र सरकार काश्मीरमध्ये बांधणार रिसॉर्ट; लवकरच जमिनीची खरेदी

या दोन्ही रिसॉर्टच्या उभारणीसाठी जवळपास २ कोटीचा खर्च अपेक्षित असल्याचे 'एमटीडीसी'कडून स्पष्ट करण्यात आले.

Updated: Sep 3, 2019, 06:26 PM IST
महाराष्ट्र सरकार काश्मीरमध्ये बांधणार रिसॉर्ट; लवकरच जमिनीची खरेदी title=

मुंबई: जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) काश्मीरमध्ये दोन रिसॉर्ट बांधण्यात येणार आहेत. अनुच्छेद ३७० रद्द झाल्यामुळे इतर राज्यातील नागरिकांना काश्मीरमध्ये जमीन विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचाच फायदा घेत 'एमटीडीसी'कडून पहलगाम आणि लेह येथे रिसॉर्टची उभारणी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 

महाराष्ट्रातून अमरनाथ यात्रा आणि वैष्णव देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा फायदा होईल. सध्या महाराष्ट्र सरकार पहलगाम आणि लेहमध्ये जमिनीच्या शोधात आहे. केंद्र सरकार किंवा खासगी मालकीची जमीन सरकारकडून खरेदी केली जाईल. या दोन्ही रिसॉर्टच्या उभारणीसाठी जवळपास २ कोटीचा खर्च अपेक्षित असल्याचे 'एमटीडीसी'कडून स्पष्ट करण्यात आले.

येत्या १५ दिवसांमध्ये जमिनीच्या सर्वेक्षणाचे काम सुरु होईल. रिसॉर्ट हे श्रीनगर विमानतळापासून जवळच्या अंतरावर असावे, हा आमचा प्रयत्न आहे. तसेच लेहमधील रिसॉर्ट हे खास महाराष्ट्रातील गिर्यारोहकांचा विचार करून बांधले जाईल, असेही जयकुमार रावल यांनी सांगितले.