Maharashtra State Board Manusmriti In School Syllabus: राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम आराखड्यात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेसह मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्यात आला आहे. मूल्य आणि स्वभाववृत्ती या शीर्षकाखाली मनुस्मृतीतील श्लोकाचा संदर्भ देण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा एससीईआरटीनं जाहीर केला आहे. देशातील पारंपरिक, प्राचीन ज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करुन देण्यासाठी ज्ञानप्रणाली विषयाचा समावेश करण्यात आला आहे. यात मनुस्मृतीतील श्लोकाचा संदर्भ देण्यात आला आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांच्या शिक्षण आराखड्यामध्ये भगवत गीता, मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे. यावरुन राजकीय वाद-प्रतिवाद सुरु झाले आहेत. नव्या शिक्षण आराखड्यामध्ये प्राचीन ज्ञानवारसा जपूया या या मथळ्याखाली पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव आहे. याअंतर्गत 1 ते 25 मनाचे श्लोक हे इयत्ता तिसरी ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत पाठांतरासाठी असतील. तसेच 25 ते 50 क्रमांकाचे मनाचे श्लोक हे इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी असतील. त्याचप्रमाणे भगवदगीतेचा अध्याय 12 वा 9 व्या इयत्तेपासून 12 व्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी असेल, असा प्रस्ताव आराखड्यात आहे. तसेच मूल्ये आणि स्वभाववृत्तीच्या अध्ययनासाटी मनुस्मृतीमधील श्लोकांचासमावेश केल्याचं आराखड्यात दिसत आहे. हा एकूण 336 पानांचा आरखडा आहे. या आराखड्यावर आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.
मनुस्मृतीतील श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जोरदार आक्षेप घेतला आहे. मनुस्मृतीतील श्लोक अभ्यासक्रमात खपवून घेणार नाही असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना, शालेय पुस्तकाचे रिराईट करण्याची बातमी चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. "यावरून राज्य सरकारची मानसिकता कळतेय. याबाबत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी लक्ष घालावं," असं शरद पवार म्हणाले आहेत.
सदर प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. "मनाचे श्लोक हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानूवर्ष म्हटले जातात, ऐकले जातात, बोलले जातात. आता ते अभ्यासक्रमात आहे की नाही हे मला माहिती नाही. मी ते तपासलेले नाही. एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की विनाकारण संभ्रम तयार करायचा प्रयत्न चुकीचा आहे,' असं फडणवीस पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.