राज्यात दोन आठवडे पावसाची विश्रांती, पण मुंबईसह 'या' जिल्ह्यांसाठी अलर्ट

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. येत्या दोन आठवड्यातही पावसाचा जोर ओसरणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 6, 2023, 11:25 AM IST
राज्यात दोन आठवडे पावसाची विश्रांती, पण मुंबईसह 'या' जिल्ह्यांसाठी अलर्ट title=
maharashtra rain update relief in Mumbai and maharashtra as IMD predicts less intense rainfall until next week

Maharashtra Rain Update: गेल्या महिन्यात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचा जोर ओसरला आहे. तर, पुढील दोन आठवडेही पावसाची विश्रांती राहणार आहे. हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

या राज्यांत पावसाची स्थिती

गेल्या महिन्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर पुढील दोन आठवडे पाऊस विश्रांती घेणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. पण राज्यातील इतर भागात मात्र पावसाची स्थिती नसणार आहे, असं अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

शेतीच्या कामांना वेग येणार

सलगच्या होणाऱ्या पावसानंतर राज्यातील पुढील दोन आठवडे कोरडे वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. यामुळे शेतीला पूरक कामे करून घेण्यास शेतकऱ्यांना वेळ मिळणार आहे. राज्यात १ जूनपासून सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झाला आहे.

जुलै महिन्यात 13 टक्के पाऊस अधिक

दरम्यान, देशात जुलैमहिन्यात सरासरीपेक्षा 13 टक्के अधिक पाऊस झाला होता. मात्र, मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा थोडा कमी म्हणजे 92 टक्के पाऊस होईल. असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत किनारपट्ट्यांचा परिसर, ईशान्य भारतातील काही ठिकाणांचा अपवाद वगळता देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय. 

धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा

दरम्यान, जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणारी बहुंताश धरणे भरली आहे. तानसा, भातसा, वैतरणा या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठी उपलब्ध झाला आहे. मुंबईला सात ते आठ महिने पुरेल इतका पाणीपुरवठा उपलब्ध आहे. तर, ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळील बारवी धरण 100 टक्के भरले आहे. बारवी धरणातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर तसच मीरा-भाईंदरच्या औद्यागिक क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. बारवी धरणाची क्षमता 340.48 दशलक्ष लिटर इतकी आहे.