Raigad Rain News: कोकणातील समुद्रात वादळी वाऱ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात वादळी वारे वाहत आहेत. कोकणा हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रायगडमधील अलिबागमध्येही पावसामुळं मोठी दुर्घटना घडली आहे. अंगावर वीज पडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
रायगडमधील अलिबाग तालुक्यातील दिवलांग पेझारी येथील रात्री 9.30 वाजण्याच्या ही दुर्देवी घटना घडली आहे. रघुनाथ म्हात्रे आणि ऋषिकेश म्हात्रे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. दोघेही बाप-लेक संध्याकाळच्या वेळेस गावाजवळ असलेल्या मत्स्यतलावात खाद्य टाकण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली आहे. मुसळधार पाऊस असतानाच दोघांच्या अंगावर वीज पडली होती.
वीज पडल्यामुळं दोघेही गंभीर जखमी झाले होते. गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांवपूर्वीच त्यांच्या मृत्यू झाल्याचे समोर आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. तहसीलदार विक्रम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे.
अरबी समुद्रात कालपासून वादळ निर्माण झाले आहेत. त्यामुळं कोकणात वादळी वारे वाहत असून अधून मधून विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी येत आहेत. वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून देवगड बंदरात हजारो मच्छीमार नौका दाखल झाले आहेत.समुद्रात वादळी वाऱ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात परतीच्या पावसाने दाणादाण उडवली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
काल रात्री अमरावती जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली या वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडात आलेल्या पावसाने अनेकांच्या घरावरील छत उडाले असून अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव परिसरातील नागरिकांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील साहित्य पाण्यात भिजले असून सर्व जीवनावश्यक साहित्य भिजल्याने संसार उघड्यावर पडले आहे. काही घरांवरील टिन पत्रे उडाले असून घरातील TV, फ्रीज आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात फुटले आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.