प्रताप नाईक, झी २४ तास, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातल्या काही भागातला पूर ओसरतोय. जिथं पूर ओसरलाय तिथं चिखल आणि कचऱ्याचे ढिग दिसतायत. या चिखलामुळे कोल्हापुराला रोगराईचा धोका निर्माण झालाय. कोल्हापुरातल्या काही भागात पूर ओसरु लागलाय. ज्या भागात पुराचं पाणी ओसरलंय त्या भागात आता फक्त चिखल आणि कचरा उरलाय. शिवाय या भागात दुर्गंधीही पसरु लागलीय.
महापालिका प्रशासनानं चिखल आणि कचरा उचलायला सुरुवात केलीय. महापालिकेचे सफाई कर्मचारी तर विना बूट आणि हातमौजे न घालताच काम करतायत. त्यामुळं संभाव्य रोगराईचे पहिले बळी महापालिका कर्मचारीच ठरण्याची शक्यता आहे. झी २४ तासनं याबाबत महापालिकेच्या मुकादमांना विचारलं असता त्यांनी सारवासारव केली.
जिथं पूर ओसरतोय तिथं साफसफाई करणं अतिशय गरजेचं आहे. पण कोणतीही संरक्षक साधनं न देता सफाई कामगारांना कामाला जुंपणं म्हणजे त्यांच्या आरोग्याशी खेळण्यासारखंही झालंय.