उद्धव ठाकरेंचा ढाण्या वाघ शिंदे गटात; आमश्या पाडवी पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांसह मुंबईत

Aamshya Padavi : लोकसभा निवडणूक जाहीर होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.  विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी हे आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समोर आलं आहे.

प्रशांत परदेशी | Updated: Mar 17, 2024, 09:36 AM IST
उद्धव ठाकरेंचा ढाण्या वाघ शिंदे गटात; आमश्या पाडवी पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांसह मुंबईत title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया नंदुरबार : शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे आज शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आमश्या पाडवी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला पक्षप्रवेशासाठी जात असल्याचा व्हिडिओ त्यांनी आपला इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेला आहे. त्यांच्या अधिकृत पेजवरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यामुळे ते शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

आमश्या पाडवी हे शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही. दूरध्वनीवर देखील त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. आदल्या दिवसापर्यंत आपण कुठेही जाणार नसल्याचे सांगणारे आमश्या पाडवी रात्री आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला शिवसेनेला पक्ष प्रवेशासाठी रवाना झाले आहेत. 

पाडवी यांनी 1995 पासून स्थानिक राजकारणाला सुरुवात कोवली विहीर गावाचे सरपंच म्हणून केली. दोन वेळा अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापतीपद भूषवले आहे. वीस वर्षापासून पंचायत समिती सदस्य होते. ते अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असून, गेल्या अकरा वर्षापासून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आदिवासींच्या विविध प्रश्नांवर आक्रमक मोर्चे काढणारा आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. 

2014 च्या निवडणुकीत त्यांनी सेनेत प्रवेश केला तेव्हापासून ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्यांनी दोन वेळा शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक देखील लढवली. मात्र दोन्ही वेळा त्यांच्या पराभव झाला होता. मात्र आक्रमक आदिवासी चेहरा असल्याने शिवसेनेच्यावतीने त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं. विधान परिषदेत आदिवासींच्या बुलंद आवाज म्हणून आमश्या पाडवी यांची ओळख निर्माण झालेली आहे. मात्र आता पाडवी हे शिंदे गटात जाणार असल्याचे म्हटलं जात आहे.

दरम्यान, शनिवारीच आमदार आमश्या पाडवी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा या निराधार असल्याचे स्पष्ट केले होते. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार असलेल्या आमश्या पाडवी हे वेगळा निर्णय घेतील अशी चर्चा रंगली होती. मात्र याबाबत त्यांनी स्वतः पुढे येत आपण कुठेही जाणार नसल्याच त्यांनी स्पष्ट केलं होतं. लोकसभा निवडणुकीत शिवसेना नंदुरबारची जागा ही ठाकरे गटाला सोडण्यात यावी अशी मागणी असून, उमेदवारी आमदार आमश्या पाडवींना देण्याची मागणी केली जातं होती. याबाबतही आमश्या यांनी आपण लोकसभा उमेदवारीसाठी तयार असल्याचे जाहीर केले होते.