राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, अजित पवारांच्या गळाला बीडचा दुसरा पुतण्या?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर बीडमधला आणखी एक पुतण्या अजित पवार गटात सहभागी होणयाची शक्यता आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असंही बोललं जात आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 11, 2023, 05:13 PM IST
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, अजित पवारांच्या गळाला बीडचा दुसरा पुतण्या? title=

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड :  राज्याच्या राजकारणात गेले काही महिने मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) फुटून अनेक आमदार अजित पवार गटात सहभागी झाले. इतकंच काय तर शिंदे-फडणवीस सरकारशी (Shinde-Fadanvis Government) हातमिळवणी करुन सत्तेतही सहभागी झाले. आता आणखी एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. 

क्षीरसागर कुटुंबामध्ये फूट पडल्यानंतर माजी आमदार जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर (Sandeep Kshrisagar) याने बंड केलं आणि चुलत्याचा पराभव करून बीड विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आले. आता जयदत्त क्षीरसागर यांचा दुसरा पुतण्या योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची योगेश क्षीरसागर यांनी भेट घेतल्याची ही माहिती आहे. विशेष म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांचा अद्याप कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याचा निर्णय झालेला नाही..

अखिल भारतीय तैलिक समाजाचे नेते म्हणून जयदत्त क्षीरसागर यांची ओळख आहे.. मात्र शिवसेनेमधून निलंबन करण्यात आल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी अद्याप कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही.  मध्यंतरी काही राजकीय कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जयदत्त क्षीरसागर यांनी व्यासपीठावर हजेरी लावली. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली होती. मात्र अद्याप कोणत्याही राजकीय पक्षा संदर्भात त्यांचा निर्णय झालेला नाही..

पण दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचं अजित पवार गटात जाण्याचं जवळपास निश्चित झालं आहे. योगेश क्षीरसागर हे जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांचे पूत्र आहेत. डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर आणि 
मुलगा डॉक्टर योगेश क्षीरसागर हे  धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार हालचाली सुरु आहेत.  दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णया संदर्भात जयदत्त क्षीरसागर हे इच्छुक नसल्याचं बोललं जात आहे. 

राष्ट्रवादीत तिसरा पुतण्या
बीड जिल्ह्यामध्ये या अगोदर दोन पुतण्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.  यात पहिले आहेत धनंजय मुंडे. धनंजय मुंडे यांनी 2013 रोजी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत काका गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात बंड केलं.  त्यानंतर 2017 च्या बीड नगर परिषद निवडणुकीमध्ये काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी दंड थोपटले. संदीप क्षीरसागर हे सध्या शरद पवार गटात आहेत. आता 2023 मध्ये जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे असलेल्या योगेश क्षीरसागर अजित पवार यांच्या गळाला लागल्याची सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे, काही दिवसात ते अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.