"जे गेलेत त्यांना परत येण्याची संधी, पण..."; राष्ट्रवादीतल्या बंडानंतर जयंत पाटील यांची स्पष्ट भूमिका

NCP Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी नऊ आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. या घडामोडीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीने पक्षाने कारवाईचे संकेत दिले आहेत.  

आकाश नेटके | Updated: Jul 3, 2023, 12:56 PM IST
"जे गेलेत त्यांना परत येण्याची संधी, पण..."; राष्ट्रवादीतल्या बंडानंतर जयंत पाटील यांची स्पष्ट भूमिका  title=

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला आहे. राजभवनात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचं चित्र आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीते 40 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी रात्री उशिरा विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे जे गेलेत त्यांना परत येण्याची संधी आहे असेही जयंत पाटील म्हणाले. तसेच राष्ट्रवादीतून गेलेल्या आमदारांना 5 जुलैपर्यंत परत येण्याचा अल्टीमेटम जयंत पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.

"काल ज्या नऊ जणांनी आमच्या पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन भाजपसोबत शपथ घेतली त्याचक्षणी ते अपात्र झाले. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना माहिती दिली. आम्ही त्यांना आमचं म्हणणं ऐकावं म्हणून विनंती केली आहे. विधानसभेचे अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. आमच्यातील नऊ आमदार गेले आहेत. उरलेले आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत. या सगळ्यात आम्हाला काँग्रेससोबत स्पर्धा करायची नाही. आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. आमची संख्या कमी असेल तर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. पण यासाठी काही दिवस जावे लागतील," असे जयंत पाटील म्हणाले.

"काल जे शपथविधीसाठी उपस्थित होते त्यातील बरचे लोक शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना परत येण्याची संधी देऊ. पण जे येणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. बरेच आमदार आमच्या संपर्कात आहेत. विरोधी पक्षनेते पदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. येणाऱ्या दिवसांत किती लोक आमच्यासोबत आहे हे समोर येईलच. आमच्यातील नऊ जण तिथे गेले आहेत आणि त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. बाकी सर्वजण आमच्यासोबत आहेत. शरद पवार यांच्या मंजुरीने हे झालेलं नाही. शरद पवार त्यांच्या मतावर ठाम आहेत," असेही जयंत पाटील म्हणाले.

राहुल नार्वेकर काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत बोलताना राहुल नार्वेकर यांनी "महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील 9 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. आज मी ती वाचून, त्याचा अभ्यास करुन य़ोग्य निर्णय घेईन," असं म्हटलं आहे.