कपिल राऊत, झी मीडिया, भिवंडी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती ही अजून कायम आहे. आमदार, खासदारानंतर आता नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात जाण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. ठाणे, नवी मुंबई, बदलापूर यानंतर आता भिंवडी महानगरपालिकेतील शिवसेनेचे जवळपास 25 ते 30 नगरसेवक हे शिंदे गटात जाणार आहेत. (maharashtra political crisis bhiwandi muncipal coroporation shiv sena corporators will join eknath shinde group)
विशेष म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शिव संवाद यात्रेनिमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दरम्यान भिवंडी महापालिकेतील सेना नगरसेवकांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का समजला जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आदित्य यांनी राज्यभर संघटनेला बळ देण्यासाठी शिव संवाद यात्रा घेण्याचं ठरवंल. त्यानुसार त्यांनी आज भिवंडीत सभा घेतली. मात्र या सभेनंतर सेना नगरवेसवकांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे सेनेला खिंडार पडणार असल्याचं स्पष्ट झालंय.
दरम्यान इतकंच नाही, तर सेनेसोबत काँग्रेसलाही शिंदेंनी झटका दिला आहे. भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचेही काही नगरसेवक शिंदे गटात जाणार आहेत.