Maharashtra Politics : वज्रमूठ मविआची, चेहरा मात्र ठाकरेंचाच! उद्धव ठाकरेच मविआचं नेतृत्व करणार?

छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा झाली. मात्र या सभेत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे भविष्यात ठाकरेच मविआचे नेते असतील यावर शिक्कामोर्तब झालं.

Updated: Apr 3, 2023, 10:15 PM IST
Maharashtra Politics : वज्रमूठ मविआची, चेहरा मात्र ठाकरेंचाच! उद्धव ठाकरेच मविआचं नेतृत्व करणार? title=

Maharashtra Politics : स्टेजवर एंट्रीवेळी तुफान आतषबाजी.. स्टेजवर येताच स्वागतासाठी दादा नेत्यांनी मानानं उभं राहणं.. बसण्यासाठी इतरांपेक्षा वेगळी खुर्ची. हा थाट होता उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा (Uddhav Thackeray). छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chatrapati SambhajiNagar) मविआची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभा झाली. सभा महाविकास आघाडीची होती मात्र चेहरा होते फक्त अन् फक्त उद्धव ठाकरेच. या सभेतून अशा अनेक गोष्टी ठळकपणे दिसल्या ज्यातून ठाकरेच मविआचे दादा नेते.. मुख्य नेते असतील असं ठळकपणे दिसलं. किंवा तसं प्रोजेक्ट करण्यात आलं.

माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) स्टेजवर होते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणही (Ashok Chavan) होते. मात्र अशा दिग्गजांच्या एंट्रीला जे झालं नाही, ते ठाकरेंच्या एंट्रीला झालं. अशोक चव्हाणांचं भाषण सुरु असताना ठाकरेंची एंट्री झाली आणि उपस्थित लोकांनी एकच जल्लोष सुरु केला. मविआचे सर्व नेते उठून उभे राहिले. ठाकरेंची ग्रँड एन्ट्रीला फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.. ठाकरेंची स्टेजवरची खुर्चीही त्यांच्या एंट्रीला साजेशी होती. उद्धव ठाकरेंची स्पेशल खुर्ची स्टेजवर सर्वात मधोमध ठेवण्यात आली होती. 

एका बाजूला अजितदादा तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरातांना (Balasaheb Thorat) स्थान होतं. ठाकरे सर्वात मध्ये होते. इतरांच्या खुर्च्या लाल रंगाच्या होत्या.. फक्त ठाकरेंची खुर्ची भगव्या रंगाची होती. इतकंच नाही तर एखाद्या पक्षाचा प्रमुख जसं सर्वात शेवटी भाषण करतो त्याचप्रमाणे ठाकरेंची एंट्रीही सर्वात शेवटी झाली आणि त्यांचं भाषणही सर्वात शेवटी झालं. त्यापूर्वी मविआच्या प्रत्येक नेत्यानं आपल्या भाषणात ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेल्या कामाचा उल्लेख केला. 

एकप्रकारे ठाकरेच मविआचं नेतृत्व करतील, तेच मविआचे प्रमुख नेते आणि चेहरा असतील हे सभेत घडलेल्या या सर्व गोष्टींवरुन प्रोजेक्ट करण्यात आलं अशी चर्चा आहे. अर्थात ठाकरेंना प्रोजेक्ट करण्यात आलं ती सभा होती छत्रपती संभाजीनगरची. संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र याच ठिकाणहून शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची संख्याही सर्वाधिक आहे. त्यामुळे तिथे ठाकरे गटाला उभारी देणं ही काळाची गरज आहे. म्हणूनच ठाकरेंना संभाजीनगरमध्ये बळ देण्यात आलं अशी चर्चा आहे. मविआतील ज्या पक्षाची जिथे ताकद तिथे त्या त्या पक्षाच्या नेत्याला बळ देण्यात येईल. नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि पुण्यातल्या सभेत अजित पवारांनाही प्रोजेक्ट केलं जाऊ शकतं असाही अंदाज बांधला जातोय.

सत्तेसाठी तुम्ही काय चाटत होतात?
संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी जोरदार घणाघात केला. यातवेळी त्यांनी अमित शाहा यांना प्रत्युत्तरही दिलं. 'सत्तेसाठी मी तळवे चाटले अशी टीका अमित शाहांनी पुण्यात केली होती, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, तर तुम्ही सत्तेसाठी शिंदेंचं काय चाटताय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.