Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शिरुरचे खासदार अमोल कोल्हे (amol kolhe) हे भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याचे सातत्याने म्हटलं जात आहे. विविध कारणांमुळे अमोल कोल्हे हे भाजपमध्ये जाणार असल्याचे वारंवार बोलले जात असते. अमोल कोल्हे यांनी याबाबत नकार दिला असला तरी भाजप याबाबत मात्र कायमच संदिग्ध भूमिका घेत आली आहे. अशातच आता राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य केले आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
2019 मध्ये शिरूर येथून आढळराव पाटील निवडणूक लढले. त्यांना अमोल कोल्हे यांनी पाडले.आढळरावांसारखा तीन टर्मचा खासदार असतानाही उद्या कोल्हे भाजपात येणार असले, तर आढळरावांना समजावलंच जाईल की कोल्हे विद्यमान खासदार आहेत. आम्हाला त्यांना तिकीट द्यावेच लागेल. ते विद्यमान खासदार आहेत. त्यानंतर विषय येईल आणि कोल्हेंना निर्णय घ्यावा लागेल की त्यांनी एकनाथ शिंदेंकडून निवडणूक लढवायची की भाजपाकडून लढायची? मग त्यांना विचारले जाईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
अजित पवार यांनी लगावला टोला
चंद्रकांत पाटील यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांसोबत बोलताना याबाबत भाष्य केले आहे. "अनेकदा अशा प्रकारची चर्चा झाली आहे. चंद्रकांत पाटील राजकारणात आल्यापासून कोण कुठे जाणार याची यादी काढली तर एकूण किती संख्या झाली हे समजणार नाही. कोण वक्तव्य करतं आणि त्या वक्तव्यावरुन त्याला किती महत्त्व द्यायचं हे ठरवा, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
जागा वाटपावर चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण
"सध्या शिंदे गटाकडे 39 अधिक 10 म्हणजेच 49 संख्याबळ आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना तेवढ्यावरच थांबवायचं असा कोणताही विषय कुणाच्याही डोक्यात नाही. बावनकुळेंनाही तसं म्हणायचं नव्हतं. पण त्यावर आत्ताच निर्णय घेता येणं शक्य नाही. सर्वे होतील, बैठका होतील, मतमतांतरं होतील, नवीन माणसं येतील," असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
कशामुळे सुरु झाली चर्चा?
फेब्रुवारीमध्ये नागपुरात झालेल्या एका सभेत अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचा प्रचार केल्याचा दावा करण्यात आला होता. यावर स्पष्टीकरण देताना अमोल कोल्हेंनी कोणताही गैरसमज करु नका असे म्हटलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाष्य केले आहे.