मुंबई : महाराष्ट्रामध्ये एका दिवसात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० हजारांपेक्षा जास्तने वाढ झाली आहे. आजच्या एका दिवसात कोरोनाचे १०,३२० नवे रुग्ण सापडले आहेत, तर २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४,२२,११८ एवढी झाली आहे. यातले १,५०,६६२ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तर २,५६,१५८ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आलं आहे. आजच्या एका दिवसात कोरोनाचे ७,५४३ रुग्ण घरी गेले आहेत. राज्यातला रुग्ण बरे व्हायचा दर आता ६०.६८ टक्के एवढा झाला आहे.
महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत १४,९९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील कोरोना मृत्यूदर ३.५५ टक्के एवढा आहे. राज्यात काल आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी कोरोनाग्रस्तांची वाढ पाहायला मिळाली होती. गुरुवारी एका दिवसात कोरोनाचे ११,१४७ रुग्ण वाढले होते, तर २६६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती.
राज्यामध्ये आजच्या एका दिवसात पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. पुणे मनपा क्षेत्रात आजच्या एका दिवसात कोरोनाचे १,६३५ रुग्ण वाढले, यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५८,५५९ एवढी झाली आहे. पुण्यात आजच्या दिवसात ३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात आत्तापर्यंत १,४४० जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
मुंबईमध्ये आज कोरोनाचे १,०८५ रुग्ण सापडले आहेत. यामुळे मुंबईतली कोरोनाग्रस्तांची संख्या १,१४,२८४ एवढी झाली आहे. आजच्या एका दिवसात मुंबईमध्ये ५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईतली कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ६,३५३ एवढी झाली आहे.