Maharashtra-Karnataka border dispute : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोल्हापूर ते निपाणी एसटी सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. (Maharashtra-Karnataka ST Bus) तर, कर्नाटकनेही सीमाभागातील परिवहन सेवा बंद केलीय. त्यामुळे, सीमाभागातील प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होत आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यांनंतर राज्यात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांसह अनेक संघटना आक्रमक झाल्या होत्या. कर्नाटकच्या बसेसना काळं फासत जय महाराष्ट्रचे नारे त्यावर लिहिण्यात आले होते. त्यानंतर, कर्नाटकने सीमाभागात त्यांची परिवहन सेवा बंद केली होती. काही ठिकाणी कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहण्यात आले आहे. त्यामुळे आता वादात अधिक भर पडली.
महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी एसटी बस सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे वक्तव्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही राज्यातील ताणवाचे वातावरण निवळेपर्यंत दोन्ही राज्यांनी बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, कर्नाटकात कन्नड रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळेच, आता महाराष्ट्र एसटी महामंडळानेही कर्नाटकातील एसटी सेवा बंद केलीय. कर्नाटकच्या बसला दौंडमध्ये शाई फासण्यात आल्यानंतर कलबुर्गीमध्ये महाराष्ट्राच्या बसला काळे फासण्यात आले आहे. या वाढत्या तणावामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, दुसरीकडे कर्नाटकी गुळाला कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चाप लावलाय.. कर्नाटकी गूळ कोल्हापुरी म्हणून विकणाऱ्यावर आत्ता फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी याबाबत आदेश दिलेत. या आदेशानंतर बंद असलेले गुळाचे सौदै पुन्हा सुरु झालेत.
कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात आणलेला गूळ कोल्हापुरी म्हणून विकला जात होता. हा गूळ स्वस्तात मिळतो म्हणून अनेक व्यापारी कर्नाटकी गूळ खरेदी करुन त्याची कोल्हापुरी गुळाच्या नावाने विक्री करत होती. या गुळामुळे कोल्हापुरी गुळाचं नाव खराब होतंय अशी तक्रार करत स्थानिक शेतकऱ्यांनी गुळाचे सौदे बंद पाडले. अखेर जिल्हाधिका-यांनी या गुळाच्या विक्रीवर निर्बंध आणल्यानंतर आजपासून गुळाचे सौदे पुन्हा सुरु करण्यात आले.