Maharashtra Rain : राज्यात जोरदार पाऊस, मराठवाड्याला मोठा दिलासा

Maharashtra Rain​ News : राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे. तर कोकणात मुसळधार पाऊस आहे. 

Updated: Jul 13, 2022, 09:08 AM IST
Maharashtra Rain : राज्यात जोरदार पाऊस, मराठवाड्याला मोठा दिलासा title=
संग्रहित छाया

मुंबई : Maharashtra Rain News : राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे. तर कोकणात मुसळधार पाऊस आहे. दरम्यान, मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातून तीन दिवसात 5 टीएमसी पाणी मराठवाड्याला सोडण्यात येणार आहे.. विविध धरणांतून गोदावरीत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. सध्या नांदूरमधमेश्वर धरणातून गोदावरीत 72 हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मराठवाड्याची पाण्याची चिंता लवकर मिटणार आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फूट 2 इंचावर पोहचलीय. पंचगंगा नदीची इशारा पातळी ही 39 फूट तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे. असं असले तरी जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी आपलं पात्र सोडलंय. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं देखील आपलं पात्र सोडलं असून आजूबाजूला हे पाणी पसरलंय. याच पंचगंगा नदीची ड्रोन दृश्यं टिपलीयत कोल्हापुरातील तौफिक मिरशिकारी यांनी...पंचगंगा नदी हळू हळू आपलं रूप बदलून ती अक्राळ विक्राळ होत असल्याचं या दृश्यांमधून दिसून येतंय. नदीचं पाणी आजूबाजूच्या शेतात गेलं असून पाऊस असाच सुरू राहिला तर नदीचं हेच पाणी नदी काठच्या मानवी वस्तीत शिरु लागले आहे.

 नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिकच्या धरण क्षेत्रात पाऊस असल्यान गोदावरी नदीपात्रात मोठया प्रमाणात विसर्ग सुरू आहे. यामुळे अहमदनगरच्या कोपरगावमधून वाहणा-या गोदावरी नदीच्या लहान पुलावर पाणी आलं. आणि हा पूल पाण्याखाली गेला. तर शहरानजिकच्या बेट भागाचा संपर्क तुटला. प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिलाय. 

मालेगावमध्ये गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यात शेतकऱ्यांची दहा ते पंधरा एकर शेतजमीन पाण्याखाली गेलीयं..यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करतायंत.
 
गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं निफाड तालुक्यातील सायखेडा गावाला पाण्यानं वेडा घातलाय. त्यामुळं गोदाकाठ अनेक कुटुंबांना मंगल कार्यालय आणि शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले. या स्थलांतरित झालेल्या रहिवाशांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीनं मोफत अन्नदान सेवा आणि वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा नदी दुथडी भरून वाहतेय. दहागाव नाल्यावरून पाणी वाहत असल्यानं उमरखेड पुसद मार्ग बंद पडलाय. मागे या नाल्यावरून एसटी वाहून गेली होती. पण यंदा नव्यानं पूल बांधलेल्या पुलावरुनही पाणी वाहू लागलं. दुसरीकडे उमरखेड ढाणकी हा मार्गही पुरामुळे बंद झालाय. यवतमाळ प्रशासनानं पूरस्थिती पाहता आज शाळांना सुट्टी दिलीय. 

पुरामुळे 30 कुटुंबं उघड्यावर

वर्ध्यातील पवनूर गावाला पुराचा विळखा बसला. वनविभागाचा बांध फूटल्यानं गावात पाणी शिरलं. यामुळे गावातील 30 कुटुंबं उघड्यावर पडलीयेत. त्यांची प्रशासनाकडून गावातील मंदिरात सोय करण्यात आली. बांध मातीचा असल्याने तो फुटलाय. या आधी ग्रामपंचायतीनं हा बांध बांधण्याचा प्रस्ताव दिला होता.

अकोला, हिंगोलीत चांगला पाऊस

अकोला जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात उशीरानं का होईना पावसानं हजेरी लावली. आता या पावसामुळं पाणकास नदीवरचं करंजा रमजाणपूर धरण 100 टक्के भरलंय. नदीच्या पाण्यानं अंत्री मलकापुरातील स्वयंभू महादेव मंदिराला वेढा दिलाय. पाण्यानं वेढलेल्या स्वयंभू महादेव मंदिराची दृश्य ड्रोन कॅमेरात टिपलीयेत विठ्ठल नायसे यांनी.. नदीच्या पाण्यानं संपूर्ण मंदिराला आपल्या कवेत घेतल्याचं दृश्यात दिसतंय.

हिंगोली जिल्ह्यातील कयाधु, पैनगंगा, पूर्णा, आसना नद्या दुथडी भरून वाहताहेत. भटसावंगी तांडा गावाजवळच्या ओढ्याला मोठा पूर आलाय. गावाशेजारच्या काही घरात या पुराचं पाणी शिरलं. यानंतर घरातलं धान्य सामान वाचवण्यासाठी गावकऱ्यांची धावपळ झाली. आजूबाजूच्या शेतातही या पुराचं पाणी पसरले आहे.