Maharashtra Heatwave: महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या आहेत. कमाल तापमानात वाढ झाली आहे. मार्च महिन्यातच कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. अजून एप्रिल आणि मे महिना सुरूदेखील झाला नाहीये. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 26 ते 27 मार्च दरम्यान कोकणात हवामान अधिक उष्ण असेल. राज्यातील काही भागांत आत्ताच तापमानाने 40शी गाठली आहे. तापमानात वाढ होत असल्याने कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर काही टिप्सदेखील दिल्या आहेत.
उन्हाचा कडाका वाढल्याने काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळं उष्माघातासारख्या समस्या निर्माण होतात. महाराष्ट्र आरोग्य विभागाने नागरिकांना उष्माघात आणि उष्माघाताच्या लक्षणांपासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे. लहान मुलं व वृद्ध यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे आरोग्यविभागाने म्हटलं आहे. त्यांना उष्णतेसंबंधी आजार होण्याची शक्यता अधिक असते.
तापमान वाढल्यामुळं स्ट्रोकसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे ते हायड्रेट राहणे. भरपूर पाणी पिणे. प्रवास करताना डिहायड्रेश जाणवत असेल तर लिंबू पाणी प्यावे. पण शक्यतो अशावेळी पाणीसोबतच असू द्यावे. ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे घरगुती पेयच प्या. सैल व सुती कपडे घाला.
दरम्यान, मागील वर्षी उष्णतेसंबंधी आजारांमध्ये वाढ झाली होती. पुणे आणि रायगडमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले होते. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मार्च ते जुलै 2023 मध्ये 3,191 लोकांना उष्माघाताचा त्रास झाला होता. तर, यामुळं 22 लोकांना जीव गमवावा लागला होता.
मागीच वर्षीच्या तुलनेत यंदा मार्च 2024मध्ये उष्माघातासंबंधी प्रकरणात थोडी घट झाल्याचे पाहायला मिळतेय. 20 मार्चपर्यंत उष्माघाताची 13 प्रकरणे नोंदवली गेली होती. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. तरीही आरोग्य विभागाने आधीच दक्षता घेत राज्यातील विविध ठिकाणी आरोग्य केंद्रांत प्राथिमक उपचार मिळावेत याची तयारी केली आहे. आरोग्य विभाग सतर्क झाला असून उष्माघात केंद्र निर्माण केली आहेत. तसंच, प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भर उन्हात अतिकष्टाची कामे करणे, तापमान जास्त असणाऱ्या ठिकाणी काम करणे, घट्ट कपडे वापरणे
मळमळ, नैराश्य, डिहायड्रेशन, ब्लड प्रेशर वाढणे, चक्कर येणे, ताप येणे, भरपूर घाम येणे.
- अतिकष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर नसेल तेव्हाच अशी कामे करा.
- सफेद किंवा सौम्य रंगाचे कपडे घाला. शक्यतो कॉटनचे कपडे घ्या.
- भरपूर पाणी प्या, लिंबू-पाणी, लस्सी, ताक, नारळपाणी पित राहा.
- उन्हात बाहेर पडताना गॉगल, टोपी, छत्री, इत्यादी घेऊनच बाहेर पडा.
- उन्हात पार्क केलेल्या गाडीत मुलांना व प्राण्यांना बसवू नका.