मोठी बातमी: अखेर राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द

ई-पासच्या मुद्द्यावरून विरोधकांनी महाविकासआघाडी सरकारला अनेकदा लक्ष्य केले होते

Updated: Aug 31, 2020, 08:34 PM IST
मोठी बातमी: अखेर राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर: एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या ई पासची अट अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात राज्यातंर्गत प्रवासासाठी ई-पासची अट घालण्यात आली होती. मात्र, २ सप्टेंबरपासून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. 

ठाकरे सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; मुख्यमंत्री सहायता निधी तिजोरीतच पडून

ई-पासच्या मुद्द्यावरून विरोधकांनी महाविकासआघाडी सरकारला अनेकदा लक्ष्य केले होते. याशिवाय, सामान्य लोकही ई-पासच्या सक्तीविषयी नाराज होते. सर्वसामान्य नागरिकांना ई-पास मिळत नाही आणि एजंट मार्फत गेले तर लागेच ई पास मिळतो, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ई-पास चा मूळ उद्देश सफल होत नसून  नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने हि ई-पास पद्धत पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी भाजपने केली होती.

मात्र, ई पास बंद केले तर लोक कोणत्याही बंधनाशिवाय सर्वत्र मुक्त संचार करतील आणि त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढेल अशी भीतीही सरकारला वाटत होती. परंतु, अखेर विरोधक आणि जनतेच्या वाढत्या दबावानंतर राज्य सरकारने ई-पासची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या सामान्य लोकांचा प्रवास सुकर होणार आहे.