मुस्लीम कुटुंबाची हिंदू धर्मात 'घरवापसी' बागेश्वर धाम बाबांच्या दरबारात धर्मांतर

बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेत. त्यांच्या दरबारात एका मुस्लीम कुटुंबानं हिंदू धर्मात प्रवेश केला. यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. 

विशाल करोळे | Updated: Nov 9, 2023, 07:51 PM IST
मुस्लीम कुटुंबाची हिंदू धर्मात 'घरवापसी' बागेश्वर धाम बाबांच्या दरबारात धर्मांतर title=

Bageshwar Baba : छत्रपती संभाजीनगरमध्ये जमीर शेख हे आपल्या कुटुंबासह राहतात. जमीर शेख हे  व्यवसायानं मजूर आणि धर्मानं मुस्लीम. छत्रपती संभाजीनगरात झालेल्या बागेश्वर धाम बाबांच्या (Bageshwar Dham Baba) दरबारात त्यांनी चक्क हिंदू धर्म स्वीकारला. जमीर शेख एकटेच नाहीत, तर त्यांच्या कुटुंबातील 9 जणांनी देखील धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या उपस्थितीत हिंदू धर्माची दीक्षा घेतली. जमीर शेख यांनी आता आपलं नाव शिवराम आर्य असं बदललंय. तर बायकोचं नाव सीता ठेवलंय. लहानपणापासूनच आपण हिंदू रिवाजानुसार पूजापाठ करत असल्याचा त्यांचा दावा आहे. आपल्या दोन्ही मुलींची लग्नं हिंदू धर्मात करून दिल्याचं ते सांगतात. सनातन धर्मावरील श्रद्धेमुळं धर्मांतर करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. (Conversion of Muslim Family to Hinduism)

या धर्मांतरावरून आता नवा वाद सुरू झालाय. या धर्मांतरामागे बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, या धर्मांतराची आपणाला काहीच कल्पना नव्हती, असा खुलासा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलाय. त्यांनीच संभाजीनगरमध्ये धीरेंद्र शास्त्रींचा दरबार आयोजित केला होता. बागेश्वर धाम बाबांचा दरबार म्हणजे वाद असं समीकरणच बनलंय. संभाजीनगरातही तेच पुन्हा दिसून आलं.

गेल्या काही महिन्यात लव्ह जिहादवरून महाराष्ट्रातलं वातावरण तापलं होतं. विशेषतः हिंदू मुलींना जाळ्यात अडकवून मुस्लीम धर्मांतराचे प्रकार वाढल्याचा आरोप केला जात होता. मात्र आता 9 जणांच्या मुस्लीम कुटुंबानं हिंदू धर्मात घरवापसी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय.

बागेश्वर बाबा महाराष्ट्र दौऱ्यावर
संभाजीनगरमध्ये बागेश्वर धाम बाबांचा भजन आणि किर्तनाचा कार्यक्रमाचा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान त्यांनी खुलताबादमध्ये भद्र मारुतीचं दर्शन घेतलं. तसंच एका शेतकऱ्याच्या घरी त्यांनी खाली बसून चहाही घेतला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

भद्र मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर जवळच राहाणाऱ्या भीमराव आणि सुभाष फुलारे या शेतकरी बंधुंच्या घरी भेट दिली. हे दोन्ही शेतकरी आपल्या आईसोबत फुलंबरी रोडवर राहातात. धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या घरी खाली बसून त्यांच्या चहा घेतला शिवाय त्यांच्याशी गप्पागोष्टीही केल्या.