पराभवाने खचलेल्या काँग्रेसच्या नवसंजीवनीसाठी संघटनेत मोठे बदल

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसने राज्यातील संघटनेत मोठे बदल केले आहेत. 

Updated: Jul 14, 2019, 11:22 AM IST
पराभवाने खचलेल्या काँग्रेसच्या नवसंजीवनीसाठी संघटनेत मोठे बदल  title=

दीपक भातुसे, झी 24 तास, मुंबई : विधानसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसने राज्यातील संघटनेत मोठे बदल केले आहेत. कुणा एकावर निवडणुकीच्या जबाबदारीचा भार पडू नये म्हणून पहिल्यांदा पक्षाने प्रदेशाध्यक्षांसह पाच कार्याध्यक्षांची नियुक्ती केली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचलेल्या पक्षाला नवसंजीवनी देण्याचा उद्देश ठेवून जास्तीत जास्त नेत्यांना पक्ष संघटनेत जबाबदारी करून कुणी नाराज होऊ नये हा प्रयत्न काँग्रेसने केलेला दिसतोय. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसला राज्यात केवळ एकच जागा जिंकता आल्याने पक्षात प्रचंड निराशा आणि हतबलता आली आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासारखा बडा नेता पक्ष सोडून भाजपाच्या गोटात सामिल झाला, तर पक्षातील अनेक आमदार भाजपा-शिवसेनेच्या संपर्कात आहेत. अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. 

विधानसभा निवडणुकीला कशाप्रकारे सामोरं जायचं याची चिंता पक्षाला होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात पक्षाला नवसंजीवनी देणं, पक्ष सोडून जाणार्‍या आमदारांना थोपवणं, विधानसभा निवडणुकीची तयारी करणं, मित्र पक्षांबरोबर जागा वाटपाबाबत चर्चा करणे अशी जबाबदारी नव्या प्रदेशाध्यक्षांना पार पाडावी लागणार होती. विधानसभा निवडणुकीला तीन महिने शिल्लक असताना नवा प्रदेशाध्यक्ष ही जबाबदारी कशी पार पाडणार हा प्रश्न होताच. 

त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी विखे-पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्य़ातीलच बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करताना काँग्रेसने त्यांच्या जोडीला पाच कार्याध्यक्षांची नियुक्ती केली आहे. विभागवार या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यामुळे विधानसभा निवडणुकीची जबाबदारीचे वाटपही त्या पद्धतीने केले जाण्याची शक्यता आहे. 

पूर्व विदर्भातून नितीन राऊत, पश्चिम विदर्भातून यशोमती ठाकूर, मराठवाड्यातून बसवराज पाटील, पश्चिम महाराष्ट्रातून विश्वजित कदम, तर
कोकण, ठाणे, मुंबईतून मुझफ्फर हुसेन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी उत्तर महाराष्ट्रातील के. सी. पडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या करताना ज्येष्ठ आणि तरुणांचा समतोलही साधण्यात आलाय. आता काँग्रेसची ही नवी टीम विधानसभा निवडणुकीत कशी कामगिरी करणार याबाबत उत्सुकता आहे.