मुंबई : Maharashtra Budget 2022 : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर केला. अजित पवार यांनी काही महत्वाच्या मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यातल्या जनतेसाठी राज्यातल्या बजेटमधून सगळ्यात मोठी बातमी. राज्यात सीएनजी स्वस्त होणार आहे. सीएनजीचे दर तब्बल साडे दहा टक्क्यांनी कमी करण्यात आलेत.
1 . नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान देण्याची बजेटमध्ये घोषणा करण्यात आली आहे. शेततळ्यांच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. तसेच 60 हजार वीज कनेक्शनही जोडण्यात येणार आहेत.
2. राज्यात सीएनजी स्वस्त होणार आहे. सीएनजीचे दर तब्बल साडे दहा टक्क्यांनी कमी करण्यात आलेत. नैसर्गिक वायूवर साडे दहा टक्क्यांनी जीएसटी कमी करण्यात आलाय. साडे तेरा टक्क्यांवरुन सीएनजीवरचा कर ३ टक्क्यांवर आणण्यात आलाय.
3. राज्याच्या बजेटमध्ये सारथी संस्थेसाठी 250 कोटींची तरतूद कऱण्यात आली आहे. ओबीसींसाठी 3 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कमेची तरतूद असून समर्पित आयोगासाठीही वेगळा निधी देण्यात येणार आहे.
4. पुढील 3 वर्षांच्या आरोग्य सेवेसाठी बजेटमध्ये 11 हजार कोटींची तरतूद केली आहे. किडनी स्टोनचे मोफत उपचार, तर कॅन्सर निदानासाठी 8 मोबाईल व्हॅन्स सुरू होणार आहे.
5. राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला आणि नवजात शिशू रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय अर्थसंकल्पातून जाहीर केलाय. हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधूदुर्ग भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड या सगळ्या जिल्ह्यात प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय उभारलं जाईल. तसंच अकोला आणि बीड इथं आधीच रुग्णालयाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे.
6. पुण्याजवळ 300 एकरांत इंद्रायणी मेडिसिटी उभारणार. सर्व अत्याधुनिक आरोग्य सुविधा असणारी देशातील पहिली सिटी असेल. तसेच मुंबई विद्यापीठातील भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.
7. गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव आहे. शिर्डी विमानतळासाठी 1500 कोटींचा निधी आणि रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटींची निधी जाहीर केला आहे.
8. ऊर्जा खात्यासाठी 9 हजार 67कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यामध्ये अडीच हजार सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारणार तर कामगार विभागासाठी 1400 कोटींचा निधी प्रस्तावित
9 . मुंबई महानगर क्षेत्राला जलमार्गाने जोडण्याचा उद्देश आहे. झोपडपट्टी विकास योजनेसाठी 100 कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव आहे.
10. कृषी विभागासाठी 3025 कोटींचा निधी प्रस्तावित तर पर्यटन विभागासाठी 1400 कोटींचा निधी प्रस्तावित आहेत.