मुलीच्या जन्माचा सोहळा! लेकीला घरी आणण्यासाठी थेट हेलिकॉप्टरने ग्रँड वेलकम

मुलगा आणि मुलगी असा भेद करणाऱ्यांनी ही बातमी एकदा वाचाच

Updated: Apr 6, 2022, 02:30 PM IST
मुलीच्या जन्माचा सोहळा! लेकीला घरी आणण्यासाठी थेट हेलिकॉप्टरने ग्रँड वेलकम title=

News Fast, New Delhi : मुलगा आणि मुलगी असा भेद करणाऱ्यांनी ही बातमी जरूर वाचावी. कदाचित त्याच्या डोळ्यांवरची झापड उघडेल. मुलगी झाल्याचा आनंद एका कुटुंबाने अशा पद्धतीने साजरा केला की संपूर्ण देशभर याची चर्चा होत आहे. 

मुलीच्या जन्माचं भव्य स्वागत
पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव इथं राहणाऱ्या झरेकर कुटुंबात मुलीचा जन्म झाला. आपल्या मुलीला घरी आणण्यासाठी वडिल विशाल झरेकर यांनी चक्क हेलिकॉप्टरचं बूक केलं. 'आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे आमच्या मुलीचे घरी आगमन विशेष व्हावे म्हणून आम्ही 1 लाख रुपयांची हेलिकॉप्टर राईडची व्यवस्था केली, अशी प्रतिक्रिया विशाल झरेकर यांनी दिली. 

विशाल झरेकर यांच्या पत्नीने 22 जानेवारीला भोसरी इथं मुलीला जन्म दिला. त्यानंतर विशाल झरेकर यांनी मुलीच्या आगमनाची भव्य तयारी सुरु केली. मुलीला घरी आणण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर भाड्याने घेतलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून विशाल झरेकर यांचं कौतुक होत आहे. 

जेव्हा विशाल झरेकर, त्यांची पत्नी आणि मुलगी हेलिकॉप्टरने त्यांच्या गावात पोहोचली तेव्हा तेथील दृश्य पाहण्यासारखं होतं. विशालच्या कुटुंबियांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती. फुलांचे हार घालून आई आणि बाळाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली होती. 

मुलीचा जन्म हा सणासारखा साजरा व्हायला हवा. हा संदेश मला समाजाला द्यायचा आहे, अशी प्रतिक्रिया विशाल झरेकर यांनी दिली.