Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभेचा रणसंग्राम सुरू झालेला असतानाच आखाड्यात इस्लाम नावाच्या पक्षाची स्थापना झालीय. मालेगाव शहराचे माजी आमदार आसिफ शेख यांनी इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र म्हणजेच इस्लाम पक्षाची स्थापना केलीय. विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात इस्लाम पक्ष उतरणार आहे. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या मतदारसंघात इस्लाम पक्षामुळे प्रस्थापित पक्षांना आव्हान निर्माण होणार आहे. आसिफ शेख यांचे वडील काँग्रेसचे आमदार होते.
आसिफ शेख हे मालेगाव मध्य मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2014 मध्ये चुरशीच्या निवडणुकीत मौलाना मुफ्ती यांचा पराभव करत आसिफ शेख विजयी झाले. आसिफ शेख यांनी 2019 ची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली.मात्र त्यात त्यांचा पराभव झाला…पराभवानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला… राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांसोबत राहिले गेल्या महिन्यात शरद पवारांची साथ सोडून त्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी आता इस्लाम या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली. या पक्षाकडून आसिफ शेख निवडणूक लढवणार आहेत.
आसिफ यांचा नव्या पक्षामुळे मालेगाव मध्यची निवडणूक बहुरंगी होणार आहे. 2019 साली या मतदारसंघातून एमआयएमचे मुफ्ती इस्माईल 40 हजार मतांनी विजयी झाले होते. पू्र्वाश्रमीचे मौलवी असलेल्या मुफ्ती इस्माईल आता राजकारणात सक्रिय झालेत. 2006 च्या मालेगाव स्फोटानंतर मुफ्ती इस्माईल यांचा प्रभाव वाढलाय. 2009 साली मुफ्ती इस्माईल यांनी जनसुराज्य शक्तीच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर मुफ्ती यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला.
मालेगावच्या मध्य मतदारसंघात समाजवादी पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. नुकतंच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या दौऱ्यात पाच वेळा आमदार राहिलेले निहाल अहमद यांची मुलगी शान-ए हिंद यांना तिकीट जाहीर केलंय. तर काँग्रेसकडून एजाज बेग हे उत्सुक आहेत. मालेगावचा मतदारसंघ पुन्हा काँग्रेस ताब्यात राहणार का हे पाहावं लागणार आहे.
महाराष्ट्रात 11.56 टक्के मुस्लिम मतदार आहेत. 288 पैकी 38 मतदारसंघात मस्लिम मतं निर्णायक आहेत. मात्र,मालेगाव मध्य या मतदारसंघात हमखास मुस्लिम उमेदवार निवडून येतो. आता या मतदारसंघात इस्लामची एन्ट्री झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची होणार आहे.