'तुमचे पूर्वज मुघलांच्या चाकरीत होते, शिवरायांबद्दल इतका द्वेष...'; राऊत फडणवीसांवर खवळले

Maharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील विषयावरुन राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 6, 2024, 12:13 PM IST
'तुमचे पूर्वज मुघलांच्या चाकरीत होते, शिवरायांबद्दल इतका द्वेष...'; राऊत फडणवीसांवर खवळले title=
पत्रकारांशी बोलताना राऊतांनी व्यक्त केला संताप

Maharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावरुन राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे राज्यातील सर्वात मोठे नेते असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवरायांची मंदिरं उभारण्यावरुन केलेल्या विधानानंतर खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 

पोटात दुखणं सहाजिक

संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, "मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे एक विषय मांडत आहेत. त्यामुळे फडणवीस, मुख्यमंत्री शिंदेंच्या पोटात कालवाकालव सुरु झाली आहे. उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की, आमचं सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं करु. हा विषय महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीने या राजवटीमध्ये शिवरायांचा अवमान झाला, महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर कोसळून पडला, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान फडणवीस, शिंदे, अजित पवांरांनी दिल्लीच्या चरणी गहाण ठेवला. वारंवार दिल्लीसमोर झुकत आहेत. महाराष्ट्राला प्रेरणा मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदीर प्रत्येक जिल्ह्यात उभारणार असं उद्धव ठाकरे सांगत आहेत. लोक त्याला प्रतिसाद देत असल्याने विरोधकांच्या पोटात दुखणं सहाजिक आहे," असं म्हणत टोला लगावला आहे.

पाकिस्तानात मंदिर उभारु

"फडणवीसांनी या (जिल्ह्या जिल्ह्यात शिवरायाचं मंदिर उभारण्याच्या) संकल्पनेची चेष्टा केली. फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. उद्धवजी सांगत आहेत की मी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारेल. तेव्हा शिवरायांच्या भ्रष्टाचार घडवून आणणाऱ्या फडणवीसांनी त्याची खिल्ली उडाली. आधी तुम्ही मुंब्र्यात उभारा, असं ते म्हणाले. अरे मुंब्रा काय पाकिस्तानात उभारु. फडणवीसांना माहितीये का, मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा किती मोठा पुतळा आहे. कधी गेलेत का ते मुंब्र्यात?" असा सवाल राऊतांनी फडणवीस यांना विचारला आहे.

नक्की वाचा >> भाजपाचं धक्कातंत्र! राज्यातील 40 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; पाहा नेत्यांची संपूर्ण यादी

शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर

तसेच पुढे बोलताना संजय राऊत यांनी, "मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एखाद्या मंदिरासाखाच आहे. तुम्ही या देशातील मुस्लिमांचा अपमान करत आहात. बटेंगे तो कटेंगे हे तुमचं धोरण चालत नाही तर अशाप्रकारे राबवताय. तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करताय," असा आरोप फडणवीसांवर केला.

नक्की वाचा >> ...तर महाविकास आघाडी महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार देणार नाही; जाहीर सभेत ठाकरेंचं विधान

शिवाजी महाराजांबद्दल इतका द्वेष का?

राऊत यांनी कठोर शब्दांचा वापर करत, "देवेंद्र फडणवीस, तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करत होते आणि महाराष्ट्राशी गद्दारी करत होते. इतिहास बघा! ही फडणवीसी महाराष्ट्रात दाखवू नका, मराठ्यांच्या राज्यामध्ये, मराठी माणसांच्या राज्यामध्ये! आम्ही शिवाजी महाराजांचं मंदीर उभारु म्हटल्यावर तुम्हाला त्रास होतोय? वेदना होत आहेत? तुम्ही जरांगे पाटलांची चेष्टा करताय, तुम्ही मराठा आंदोलनाची चेष्टा करताय. आम्ही शिवाजी महाराजांचं मंदीर उभारु म्हटलं तर त्याची चेष्टा करताय. तुम्ही शिवसेनेची चेष्टा करताय. जी शिवसेना बाळासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून उभी केली. तुमच्या मनात छत्रपती शिवरायांबद्दल इतका द्वेष का?" असा सवाल विचारला.

नक्की वाचा >> योगींना कॅनडात पाठवण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मोदींकडे मागणी! म्हणाले, '‘बटेंगे तो कटेंगे’ हा संजीवनी...'

मंदिरं बांधतोय याची लाज वाटते का?

"याचं कारण तुमचं प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांवर नसून गुजरातवर आहे. म्हणून त्या काळात शिवरायांनी ती सूरत लुटली त्यावर तुमचं प्रेम आहे. तुम्ही अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक उभं करणार होता काय झालं? तुमच्या चेष्टेखोर भूमिकेमुळे स्मारक होऊ शकलं नाही. तुम्ही सांगाल तिथे आम्ही शिवरायांची मंदिरं बांधून देऊ. तुमची हिंमत आहे मंदिरात यायची? तुम्ही शिवराय द्वेष्टे आहात. देवेंद्र फडणवीस हा मराठी माणसाचा, अखंड महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाचा द्वेष्टा आहे हे काल पुन्हा सिद्ध झालं. आम्हाला आव्हान देता मुंब्र्यात शिवारायांचं मंदिर उभारा. लाज वाटते तुम्हाला आम्ही मंदिर बांधतोय याची. आम्ही गावागावात, जिल्ह्या जिल्ह्यात मंदिरं बांधतोय याची लाज वाटते का? अशी माणसं महाराष्ट्रात जन्माला आली आणि भाजपा त्यांना पोसत आहे. कुठून आले? गुजरातमध्ये औरंगजेबचा जन्म झालं त्याची फळं आहेत. आम्ही हे सहन करणार नाही," असंही राऊत म्हणाले.