Devendra Fadnavis Raj Thackeray: 'देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील' असा विश्वास विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच व्यक्त करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करताना या सरकारच्या निर्णयांना आपला पाठिंबा असेल असंही सांगितलं आहे. दुसरीकडे फडणवीस यांनी भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये राज ठाकरेंनी सोबत घेण्याचं सूचक विधान केलं आहे. याच पार्श्वभूमीवर राऊतांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी खोचक शब्दांमध्ये राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी आज मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरेंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही सोबत घेऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटल्याचं संदर्भ देत पत्रकाराने संजय राऊतांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना राऊतांनी, "राज ठाकरेंना खेळवलं जात आहे. राज ठाकरे भाजपाच्या हातातलं खेळणं झालं आहे, हे स्पष्ट दिसत आहे. कालच्या फडणवीसांच्या विधानावरुन हे स्पष्ट झालं आहे की राज ठाकरे हे भाजपा सांगेल त्याप्रकारे भूमिका घेत आहेत. त्याबद्दल मला मत व्यक्त करायचं नाही," असं उत्तर दिलं.
पुढे बोलताना राऊत यांनी, "लोकसभेत, विधानसभेत आता महानगरपालिकेत देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत त्यांनी काय काय भूमिका घ्यायची. एका बाजूला महाराष्ट्रात मुंबईत, मराठीत बोलायचं नाही. गुजराती, मरवाडीत बोला असा आमच्या मराठी लोकांवर भाजपाचा दबाव आहे. त्या भाजपाचं नेतृत्व करणारे फडणवीस हे राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी, राज ठाकरेंनी कोणाबरोबर जावं यासंदर्भातील पत्ते पिसत बसले असतील तर यासंदर्भातील भूमिका राज ठाकरेंनी जाहीर केली पाहिजे. आम्ही काय बोलणार? आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी आम्ही उद्धव ठाकरेंची शिवसेना शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू," असं म्हटलं आहे.
फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरेंनी सोशल मीडियावरुन आपली भूमिका मांडली. "आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. 2019 ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो," असं राज ठाकरेंनी म्हटलं.
तसेच पुढे बोलताना राज ठाकरेंनी, "पुढची पाच वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की," असं म्हणत सूचक इशारा दिला.