Ramdas Athawale On Seat Allocation: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार रामदास आठवले यांनी 'झी 24 तास'च्या जाहीर सभेत हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची खास शैलीत उत्तरे दिली. गेल्या अनेक वर्षात मी सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम केलंय. मी राजकारणात आहे पण मी राजकारणी नाही. माझ्या समाजासाठी, बाबासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ राहणारा मी कार्यकर्ता आहे. राजकारणी बनण्यापेक्षा चित्रपटात यावे, कलाकार व्हावे अशी माझी इच्छा होती. पण सिद्धार्थ काँलेजमध्ये असताना मी पॅंथरच्या माध्यमातून राज्यासह देशात फिरलो. लाखो तरुण माझ्या मागे आहे. यानंतर मला राज्यसभेमध्ये संधी मिळाली. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मला तिसऱ्यांदा संधी मिळाली. लोकसभेत खासदार नसताना मला संधी मिळाल्याचे आठवलेंनी यावेळी सांगितले.
राजकारण कोणत्या दिशेने वाहतेय याची हवा मला कळत असते. सध्या हवा ही महायुतीच्या बाजुने आहे. लोकसभेत आम्हाला जागा कमी मिळाल्या. आता ती वेळ गेली आहे. आता विधानसभेची तयारी सुरु आहे. अनेक आघाड्यांवर अनेक उमेदवार लढतायत. याचा आम्हालाच फायदा होईल. पण मुख्यमंत्री कोण होणार? हे मी आता सांगणार नाही, असे त्यावेळी म्हणाली.
महायुतीत रामदास आठवले दिसतात पण त्यामध्ये आरपीआयच्या जागा दिसत नाही. याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना आम्ही 21 जागांची मागणी केली आहे. पण चर्चेत आम्हाला कधी बोलावले नाही. सध्याच्या घडीला 8-10 जागा मागितल्या होत्या पण मिळतील असं वाटत नाही. 5 जागा मिळतील अशी आमची मागणी आहे. अन्यथा आम्हाला एमएलसी, महामंडळ मिळायला हवे. माझ्या पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत. आपल्याला किती जागा मिळाल्या? असे मला रोज फोन येतात, असेही आठवलेंनी यांनी सांगितले.
बाळासाहेबांच्या आवाहनानंतर शिवशक्ती-भिमशक्तीसाठी मी सगळीकडे फिरलो. त्याआधी माझी भाजप विरोधी भूमिका होती.2012 च्या बीएमसी निवडणूकीत आरपीआय आल्यानंतर महायुती तयार झाली. आता दोन मोठे पक्ष आल्याने आरपीआय कुठे दिसत नाही. आरपीआयला दुर्लक्षित करणे चांगल होणार नाही. त्या पत्रकार परिषदेत मला बोलायला दिले नाही. विश्वासात घेतले जात नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
असं असतानाही रामदास आठवले युतीसोबत का आहेत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना ते म्हणाले, 'मला मोदींनी मंत्रिपद दिलंय हे याचे उत्तर नाही. तर नागालॅण्डमध्ये आमचे 2 खासदार आहे. मणिपूरमध्ये माझ्या उमेदवाराला १७ टक्के बहुमत होते. अनेक राज्यांमध्ये आरपीआयच्या शाखा आहेत. मी मंत्री असल्यामुळे संपूर्ण देशात फिरण्याची मला संधी मिळते. अन्याय होतोय पण लगेच निर्णय घेणे माझ्यासाठी थोडं अडचणीचं आहे, असे उत्तर त्यांनी दिले. सर्व माझ्यासोबत असल्याने मी उलट भूमिका घेत नाही. आम्ही इतका त्याग करतो तर 3 ते 4 जागा द्यायला हव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.