सातारा : राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध बऱ्याच अंशी शिथिल करण्यात आले. ज्याअंतर्गत पर्यटन स्थळांवरही काही प्रमाणात मुभा देण्यात आली आहे. याच धर्तीवर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या महाबळेश्वरमध्येही आज (मंगशवार, 17 ऑगस्ट 2021) पासून पर्यटनस्थळं सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाबळेश्वरची (Mahabaleshwar) सर्व पर्यटनस्थळे आजपासून खुली होणार आहेत. जिल्हाधिका-यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. महाबळेश्वरमध्ये अनेकांची उदरनिर्वाहाची साधनं पर्यटनावरच अवलंबून आहेत. पण, कोरोनाच्या (Corona) संकटामुळं या साऱ्यांची गणितं बिघडली. आता मात्र परिस्थिती काहीशी सुधारताना दिसत असल्यामुळं येथील व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांनी या भागातील पर्यटन स्थळं सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर ती मागणी पूर्ण करण्यात आली असून अनेक महिन्यांपासून बंद असलेलं महाबळेश्वर पर्यटकांसाठी पुन्हा एकदा खुलं होतंय.
येथे पर्यनास मुभा देण्यात आली असली तरीही या भागात असणाऱ्या हॉटेल आणि रिसॉर्टवर सर्व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. शिवाय इथं येणाऱ्या पर्यटकांनीही कोरोनाचं संकट संपलेलं नाही याचं भान बाळगावं असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
व्यवसायाला मिळणार चालना....
हॉटेल आणि रिसॉर्ट व्यवसायांव्यतिरिक्तही महाबळेश्वरमध्ये अनेक लहानमोठे उद्योग पर्यटनावर अवलंबून आहेत. मका, स्ट्रॉबेरी, स्थानिक भाज्या, मध विकणाऱ्यांपासून ते अगदी पर्यटकांना घरगुती जेवणाच्या सुविधा पुरवणाऱ्यांपर्यंतचा व्यवसाय पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळं आता इथं पर्यटनाला पुन्हा पूर्णपणे सुरुवात होत असल्यामुळं या लघु व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळत आहे.