पंकजा मुंडेंवर टीका करणाऱ्या काकडेंना घरचा आहेर

 पंकजांच्या बीडमधल्या या अस्वस्थतेचा सामना आता पुण्यात रंगू लागलाय. 

Updated: Dec 13, 2019, 08:15 PM IST
पंकजा मुंडेंवर टीका करणाऱ्या काकडेंना घरचा आहेर title=

मुंबई : पंकजा मुंडेंची खदखद बाहेर पडल्यानंतर भाजपनं त्याची फारशी काही दखल घेतली नाही. उलट पंकजा मुंडेंचं कसं चुकलं, याबद्दल सविस्तर भाजप पुरस्कृत खासदार संजय काकडे बोलले. पण त्यानंतर पंकजांच्या निकटवर्तीय आणि पुणे भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी संजय काकडेंवर अत्यंत गंभीर आरोप केले. पंकजांच्या बीडमधल्या या अस्वस्थतेचा सामना आता पुण्यात रंगू लागलाय. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडालीय.

काकडे भाजपत फूट पाडत असल्याचा गंभीर आरोप माधुरी मिसाळ यांनी केलाय. भाजप नेतृत्वानं पंकजा मुंडेंची नाराजीही बेदखल केलीय पण आता हे पक्षात फूट पाडण्याचे आरोप झाल्यावर भाजप नेतृत्व याची दखल घेणार की नाही ? हा प्रश्न आहे. मी नाराज नाही म्हणणाऱ्या पंकजा मुंडे किती नाराज आहेत ? हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. पंकजांची खदखद बाहेर पडताच भाजप नेतृत्वाची पाठराखण करण्याचे प्रयत्न सुरू झालेले दिसत आहेत. 

पंकजा मुंडेंचं कालचं भाषण म्हणजे स्वतःच्या पराभवाचं खापर देवेंद्र फडणवीसांवर फोडण्याचा प्रकार असल्याचे काकडे म्हणाले. पंकजा मुंडे पक्षाला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पंकजा यांनी सत्तेत असताना कुठल्या समाजाचे प्रश्न सोडवले नाहीत म्हणून त्यांचा पराभव झाला. आता स्वतः अपयश झाकण्यासाठी त्या उपद्व्यापी वक्तव्य करत असल्याची टीका भाजपचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी केली होती.

'गोपीनाथ गडा'वर शक्तीप्रदर्शन 

सोशल मीडियावर नाराजीचा सूर व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडे भाजप सोडणार का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. परंतु, 'मी पक्ष सोडणार नाही... पक्षाला मला सोडायचंय तर पक्षानं निर्णय घ्यावा' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी या चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं.  'मी पक्ष सोडावा अशी कुणाची इच्छा आहे का? कुणी या वावड्या उठवल्या?' असं म्हणत त्यांनी स्वकीयांवर निशाणा साधलाय.मला कुठल्याच पदाची अपेक्षा नाही, असं म्हणत कोअर कमिटीच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावं, अशी विनंती त्यांनी चंद्रकांत पाटलांकडे केली.