हार जीत होत असते, मात्र हरणाऱ्यांनी जिद्द सोडायची नसते- फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कल्याणमध्ये कबड्डी स्पर्धेसाठी हजेरी,

Updated: Dec 29, 2019, 07:01 PM IST
हार जीत होत असते, मात्र हरणाऱ्यांनी जिद्द सोडायची नसते- फडणवीस title=

आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : खेळात हार जीत होतच असते, मात्र हरणाऱ्यांनी जिद्द सोडायची नसते, पुन्हा एकदा नव्या उमेदीनं मैदानात उतरायचं असतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कल्याणमध्ये कबड्डी स्पर्धेसाठी आले होते त्यावेळी बोलत होते. कबड्डी स्पर्धेच्या स्पर्धकांसाठी बोलत असले तरी भाजप कार्यकर्त्यांनी उमेद न सोडण्याचा संदेश दिला. त्यांनी म्हटलं की, 'सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. जे जिंकतील त्यांना शुभेच्छा देतो. पण जे जिंकणार नाहीत त्यांना जास्त शुभेच्छा देतो. कारण पुढच्या वेळेस जिंकण्य़ाची उम्मेद घेऊन पुन्हा एकदा मैदानात उतरा आणि मैदानामध्ये बाजी मारुन न्या.'

कल्याणमध्ये आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला फडणवीस यांनी हजेरी लावली होती. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी खेळाडूंना आणि इतरांना ही हरल्यानंतर ही पुन्हा एकदा नव्या उमेदीने लढायचं असतं असा संदेश दिला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर ही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. शिवसेना-भाजपची युती तुटल्यामुळे शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्रीपद गेलं असलं तर देवेंद्र फडणवीस यांची उम्मेद कायम आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाला ते हजेरी लावतांना दिसत आहेत. त्यांच्यातील आक्रमकपणा अजूनही कायम आहे.