Why Liquor Shops Closed Before Voting : लोकसभा निवडणुकांच्या चार टप्प्यांचे मतदान आतापर्यंत पार पडले आहे. आता येत्या सोमवारी 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या पाचव्या टप्प्यातील सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 49 लोकसभा जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात बिहारच्या 5, जम्मू काश्मीरमधील 1, झारखंडमधील 3, लडाखमधील 1, महाराष्ट्रातील 13, ओडिशातील 5, उत्तर प्रदेशातील 14 जागांवर आणि पश्चिम बंगालमधील 7 जागांवर मतदान पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग तीन दिवस दारुची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. पण लोकसभा निवडणुकीचे मतदान आणि दारुची दुकाने बंद ठेवण्यामागचे नेमकं कारण काय? याबद्दल आपण जाणून घेऊया.
लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 20 मे रोजी महाराष्ट्रात मतदान पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघाचा समावेश आहे. यात मुंबईतील उत्तर मुंबई मतदारसंघ, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघ, उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघ, उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघ, दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ, दक्षिण मुंबई मतदारसंघात मतदान होईल. त्यासोबतच धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघातही मतदान पार पडणार आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर सलग तीन दिवस दारुची दुकाने बंद राहणार आहेत. येत्या 18 मे पासून ते 20 मे पर्यंत मतदान असलेल्या ठिकाणी दारुची सर्व दुकाने, बार बंद असणार आहेत. पण मतदानाच्या आधी दारुची दुकाने का बंद केली जातात, याबद्दलचे कारण जाणून घेऊया.
उमेदवार किंवा कोणत्याही पक्षाने मतदारांना लाच देण्यासाठी दारुचा वापर करु नये, यासाठी निवडणुकीच्या 48 तास आधी म्हणजेच मतदानाच्या आधीचे दोन दिवस ड्राय डे म्हणून घोषित केले जातात. यादरम्यान मतदान असलेल्या ठिकाणी असलेली दारुची दुकाने बंद असतात. त्यासोबतच निवडणुकांचा प्रचार संपल्यानंतर अनेक कार्यकर्ते दारु पिऊन दंगा करतात. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दारुची दुकाने आणि बार तीन दिवस बंद ठेवली जातात. या काळात दारुचे वितरण रोखण्यासाठी मतदानाच्या तारखेच्या 48 तास आधी आजूबाजूच्या परिसरातील दारुची दुकाने बंद करणे आवश्यक असते.
दरम्यान मुंबईसह परिसरातील दारुची सर्व दुकाने, आस्थापना 18 ते 20 मे पर्यंत बंद असतील. मुंबई शहरात 18 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता दारुची दुकाने आणि बार बंद होतील. यानंतर 19 मे रोजी दिवसभर ही दुकाने बंद असणार आहे. तर 20 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता ही दुकाने पुन्हा सुरु होतील. प्रशासनाने खबरदारी म्हणून हा आदेश काढला आहे. यामुळे मद्यप्रेमींच्या घशाला कोरड पडणार आहे.