Sanjay Raut On PM Modi Amit Shah: "लोकसभेचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला व नरेंद्र मोदींकडील प्रचाराचे सर्व मुद्देही संपले. त्यामुळे देशातील महिलांच्या मंगळसूत्रांचे काय होणार? हा प्रश्न त्यांनी निर्माण केला. मोदींचा हा प्रचार म्हणजे ढोंग आणि फसवेगिरी आहे. मोदी यांनी आतापर्यंत कधीच मंगळसूत्र या पवित्र बंधनाचा स्वीकार आणि सन्मान केला नाही, मात्र आता तेच मोदी निवडणुका जिंकण्यासाठी मंगळसूत्रावर प्रवचने देताना दिसतात," असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना महाराष्ट्रात भाजपाचं नक्कीच पानीपत होणार असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
"मतदानाचा पहिला टप्पा मोदींच्या हातातून निसटला व दुसऱ्या टप्प्यातही त्यांचा बेताल प्रचार कामी येईल, अशी चिन्हे नाहीत. देशात बदल होत आहे व महाराष्ट्रही त्या बदलात सहभागी होताना दिसत आहे. रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे मतदान 19 एप्रिल रोजी पार पडले. 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणीचे मतदान झाले. या दोन्ही टप्प्यांत भाजप पिछाडीवर आहे. मोदींच्या ‘चारशे पार’च्या स्वप्नांना पहिल्या दोन टप्प्यांतच महाराष्ट्रात सुरुंग लावला. पुढल्या तिन्ही टप्प्यांत यापेक्षा मोठे हादरे बसतील. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारासाठी सर्वाधिक सभा महाराष्ट्रात घेतल्या. मोदी यांच्या सभांचा कोठेच प्रभाव पडला नाही व अमित शहांच्या सभांची दखल मतदारांनी घेतली नाही. “मोदींची लाट राहिलेली नाही. आता आपला आपणच संघर्ष करावा लागेल,” असे मत अमरावतीच्या भाजप उमेदवार सौभाग्यवती राणा यांनी व्यक्त केले ते खरेच आहे. मोदी-शहांचे नाव कोणी घेतले तरी लोक चिडतात असे वातावरण आज महाराष्ट्रात आहे," असं राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोख' सदरातून म्हटलं आहे.
"नरेंद्र मोदी यांचा पराभव निश्चित आहे व त्या भयातून ते विरोधकांच्या बाबतीत बेताल विधाने करीत आहेत. मोदी कमी पडले की, पुढचा सूर अमित शहा लावतात. “केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर जास्त मुले असलेल्या ‘घुसखोरां’ना संपत्तीचे फेरवाटप केले जाईल. महिलांची मंगळसूत्रे हिसकावून घेतली जातील,” असे एक विधान पंतप्रधान मोदी यांनी केले. पंतप्रधानपदावरील व्यक्तीस प्रचारात हिंदू-मुसलमान याशिवाय दुसरे मुद्दे नसावेत व ऐन प्रचारात मतांसाठी धार्मिक प्रचार करावा लागतो हे त्यांच्या मानसिक स्थितीचे प्रदर्शन. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कोठेही संपत्तीच्या फेरवाटपाचा, मंगळसूत्राचा उल्लेख नाही. तरीही मोदी बिनधास्त खोटे बोलतात," असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
"दोन निवडणुकांच्या मोसमात भाजपपुरस्कृत तपास यंत्रणांनी अजित पवार यांना सर्व आरोपांतून मुक्त केले. सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळ्याचे आरोप स्वतः पंतप्रधान मोदी यांनीच केले होते. याचा अर्थ मोदी व त्यांचे लोक विरोधकांवर खोटे आरोप करतात. निवडणुका जिंकून देण्यासाठी तपास यंत्रणांचा हा गैरवापर व खासगीकरण धोकादायक आहे. खोटी जात प्रमाणपत्रे भाजपमध्ये जाताच खरी ठरल्याच्या किमयासुद्धा घडल्या. भाजपने जे जे केले ते सर्व घोटाळे या निवडणुकीत त्यांच्यावरच उलटतील असे वातावरण आहे. राष्ट्रीय पातळीवरील मोदी-शहा व महाराष्ट्रात फडणवीस-शिंदे-अजित पवारांचे राजकीय पानिपत या निवडणुकीत होत आहे. केलेल्या पापकर्मांची फळे भोगावीच लागतील. ही निवडणूक त्यासाठीच आहे," असं राऊत यांनी लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.