Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच शिंदे गटापासून शिवसेनेच्या ठाकरे गटापर्यंत राज्यातील काही महत्त्वाच्या पक्षांनी विविध मतदारसंघांतील उमेदवार यादी जाहीर केलेली असतानाच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मात्र अवघ्या चार जागांनी अडचणीची परिस्थिती निर्माण केल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झालेली असतानाही महायुतीत मात्र 4 जागांसाठी राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे. जागावाटपाचं हे समीकरण निकाली निघत नसल्यामुळं मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर बैठकांची सत्र सुरु आहेत. फक्त वर्षाच नव्हे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर आणि अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानीसुद्धा नेतेमंडळींनी पहाटेपर्यंत बैठकांसाठी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
राज्यातील रत्नागिरी- सिंधुदुर्ग, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या चार मतदार संघांमुळं महायुतीच्या मतदार यादीचा प्रश्न निकाली निघत नसून, उमेदवार यादी जाहीर होणं लांबणीवर पडताना दिसत आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग - कोकणातील या दोन महत्त्वाच्या मतदार संघांवरून शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये दुमत पाहायला मिळत आहे. एकिकडून ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्याकडून या मतदारसंघासाठी स्वारस्य दाखवण्यात येत आहे तर, दुसरीकडे भाजपकडून मात्र नारायण राणे यांच्या वाट्याला ही जागा देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
धाराशिव- शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये धाराशिवच्या जागेसाठी रस्सीखेच सुरु असतानाच भाजपनंही या जागेत रस घेण्यास सुरुवात केली आहे. इथं भाजपकडून निवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांना उमेदवारी देण्याची चर्चा असून, त्यांना घड्याळाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी राष्ट्रवादीचेही प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
नाशिक - महायुतीचा सर्वात मोठा तिढा नाशिकच्या जागेमुळं असल्याचं आता अधिक स्पष्ट होताना दिसत आहे. शिंदे गटाच्या वतीनं खासदार हेमंत गोडसे यांना मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्याचं म्हटलं जात असतानाच छगन भुजबळ यांनीही या जागेसाठी आपलं नाव चर्चेत असल्याचा दावा केला जात आहे. या जागेसाठी भाजपही उमेदवार चाचपणी करताना दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावर भाजप सातत्यानं दावा करत असतना शिंदे गटही हा मतदारसंघ सोडण्यासाठी तयार नाही. इथं भाजप भागवत कराड यांना उमेदवारी देण्यासाठी इच्छुक असून, शिंदे गटाकडून मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचं नाव पुढे येत आहे.