Kolhapur Loksabha Election: शाहू महाराजांविरुद्ध लढणारे शिंदे गटाचे संजय मंडलिक आहेत कोट्यधीश! संपत्तीचा एकूण आकडा...

राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि भाजपचे संजय मंडलिक यांच्यात लढत होणार आहे. महाराजांविरोधात लढणाऱ्या संजय मंडलिकांची संपत्ती किती?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 30, 2024, 11:14 AM IST
Kolhapur Loksabha Election: शाहू महाराजांविरुद्ध लढणारे शिंदे गटाचे संजय मंडलिक आहेत कोट्यधीश! संपत्तीचा एकूण आकडा... title=

महाराष्ट्रातील राजकारणात कोल्हापुरातील राजकीय घडामोडी या कायमच चर्चेचा विषय बनला आहे. राजकारण हे कोल्हापुरातील संस्कृतीचा अविभाज्य भाग समजले जाते. याच राजकारणातून कोल्हापुरात अनेक मातब्बर राजकीय घराणी निर्माण झाल्याचा इतिहास आहे. अशातच राजकीय लढाईमध्ये घराणेशाही की इतर पक्ष यांच्यामध्ये लढाई पाहायला मिळतं. यंदाच्या 2024 च्या कोल्हापूर मतदारसंघात शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी लढत होणार आहे. 

काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले शाहू महाराज यांना प्रमुख आव्हान असणार आहे ते येथील भाजपाचे स्थानिक आमदार संजय मंडलिक यांचं. खासदार संजय मंडलिक पूर्ण ताकदिनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच स्पष्ट केलं आहे. संजय मंडलिक यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांना पराभवाची धूळ चारली. कोल्हापूर मतदारसंघात विजय मिळवला. आता संजय मंडलिक यांची लढत ही शाहू महाराजांशी होणार आहे. अशा संजय मंडलिकांची संपत्ती किती आणि त्यांचा परिचय काय? हे समजून घेणार आहोत. 

कोण आहेत संजय मंडलिक?

सदाशिवराव मंडलिक आणि विजयमाला मंडलिक यांच्या पोटी संजय मंडलिक यांचा जन्म झाला. 13 एप्रिल 1964 रोजी संजय मंडलिक यांचा जन्म झाला. संजय मंडलिक यांनी राज्यशास्त्रात एम.ए. पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तसेच त्यांनी शिवाजी विद्यापीठातून बी.एड पर्यंतचं शिक्षण पूर्ण केले. वडील सदाशिवराव मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सहकार क्षेत्रामधून राजकारणात पाऊल ठेवले. 

संजय मंडलिक यांचा राजकीय प्रवास

संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक चारवेळा खासदार राहिले. त्यामुळे साहजिकच कोल्हापूरच्या राजकारणात मंडलिक घराण्याचा प्रचंड दबदबा आहे. त्यामुळे संजय मंडलिक यांच्यासाठी राजकीय प्रवेश हा अगदीच सोपा होता. त्यांनी जिल्हा परिषदात सहकार क्षेत्रातून राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ केला. 1998 साली ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष झाले. 2003 मध्ये संजय मंडलिक कोल्हापूर जिल्हा सरकारी बोर्डाचे अध्यक्ष झाले.

एकीकडे सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापुरच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवत असताना संजय मंडलिक स्वतंत्रपणे आपल्या राजकीय कारकीर्दीला आकार देत होते. 2012 मध्ये संजय मंडलिक कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. 2014 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रावादीच्या वाट्याला आला. हा मतदारसंघ काँग्रेसने मागून घ्यावा, यासाठी मंडलिक पितापुत्रांनी दिल्लीत तळ ठोकून अनेक प्रयत्न केले. मात्र, यामध्ये त्यांना अपयश आले.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्यासाठी 2014 मध्ये संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांना मोदी लाट असूनही राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांच्याकडून 33,259 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. अखेर 2019 च्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांना 2,70,568 अशा दणदणीत मताधिक्याने मात देत जुन्या पराभवाचा वचपा काढला.                  

संजय मंडलिकांची संपत्ती किती 

शाहू महाराजांविरोधात लढत देणाऱ्या संजय मंडलिक यांच्या नावे कोट्यावधींचा संपत्ती आहे. संजय मंडलिक यांची 9,51,71,892 इतकी संपत्ती आहे तर 1,68,80,414 इतके कर्ज आहे.  त्यांनी 2019 साली खासदारकीच्या निवडणुकीला उभं राहताना जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये या संपत्तीचा उल्लेख केलेला आहे.