LoksabhaElection2019 : राष्ट्रवादीची संभाव्य उमेदवारांची पहिली यादी

पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार मात्र या निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार

Updated: Mar 12, 2019, 02:06 PM IST
LoksabhaElection2019 : राष्ट्रवादीची संभाव्य उमेदवारांची पहिली यादी title=

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ साठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची पहिला यादी तयार झालीय. येत्या एक-दोन दिवसांत ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असला तरी पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार मात्र या निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरताना दिसणार आहेत. रविवारी निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूक २०१९ च्या महत्त्वाच्या तारखांची घोषणा केलीय. लोकसभा निवडणुकीच्या ७ टप्प्यांपैकी पहिल्या चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ जागांसाठीचं मतदान होईल. महाराष्ट्रात ११ एप्रिलला ७ मतदारसंघात, १८ एप्रिलला १० मतदारसंघात, २३ एप्रिलला १४ मतदारसंघात आणि २९ एप्रिलला १७ मतदारसंघात मतदान होणार आहे तर २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. 

राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार यादी

ईशान्य मुंबई - संजय दीना पाटील

बारामती - सुप्रिया सुळे

नाशिक - समीर भुजबळ

बुलढाणा - राजेंद्र शिंगणे

सातारा - छत्रपती उदयनराजे भोसले

मावळ - पार्थ पवार

कोल्हापूर - धनंजय महाडिक

भंडारा - गोंदिया - वर्षा पटेल

जळगाव - गुलाबराव देवकर

रायगड - सुनील तटकरे

शिरूर - अमोल कोल्हे

ठाणे - आनंद परांजपे

दरम्यान, शरद पवारांच्या उमेदवारीवरून पवार कुटुंबातील मतभेद जाहीरपणे समोर आलेत. नातू पार्थ पवार यांच्यासाठी शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी पवारांचे थोरले बंधू आप्पासाहेब पवार यांचा नातू रोहित पवार यांनी 'कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा विचार करून निर्णय बदलावा' असं आवाहन सोशल मीडियावरून आपल्या आजोबांना केलंय. पराभवाच्या भीतीमुळं नाही, तर पवार कुटुंबातील तीन व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात नको, म्हणून माघार घेत असल्याचं शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.