सचिन कसबे, झी मीडिया, माढा पंढरपूर : माढा... आधीचा पंढरपूर मतदारसंघ. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाची नगरी.. संत सावता माळींचं जन्मगाव अरण देखील इथलंच. मनकर्णा नदीच्या तीरावर वसलेला हा भाग. माढेश्वरी देवीच्या नावावरून माढा (Madha Loksabha Constituency) हे नाव पडलं. राव रंभाजी निंबाळकर राजेंनी बांधलेला प्राचीन भुईकोट किल्ला हे माढ्याचं वैशिष्ट्य. 2009 साली माढा हा नवा मतदारसंघ तयार झाला. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील चार आणि सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश माढामध्ये होतो.
माढा... समस्यांचा वेढा
माढा तालुक्यातल्या अनेक गावात पाणीटंचाई पाचवीला पुजलीय. कुर्डुवाडीचा रेल्वे कारखाना कधीही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कुर्डुवाडी मोठी बाजारपेठ असतानाही रेल्वे उड्डाणपूल नसल्यानं नागरिकांची गैरसोय होतेय. टेंभुर्णी अहिल्यानगर महामार्गाचं दुहेरीकरण रखडलंय. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झालीय. केममधील नैसर्गिक पद्धतीनं कुंकू बनवण्याचा उद्योग मदतीअभावी दुर्लक्षित ठरलाय. साखर कारखाने वगळता इतर कोणतेही औद्योगिक प्रकल्प वा वसाहती इथं नाहीत
आतापर्यंत दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा, तर एकदा भाजपचा खासदार माढ्यामधून विजयी झालाय...
माढाचं राजकीय गणित
2009 साली शरद पवारांनी (Sharad Pawar) बारामतीऐवजी माढ्यामधून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यांनी भाजपच्या सुभाष देशमुखांचा 3 लाख मतांनी पराभव केला. 2014 मध्ये मोदी लाटेतही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले. त्यांनी स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत यांना केवळ 25 हजारांच्या मताधिक्यानं हरवलं. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांनी भाजपची वाट धरली. 2019 मध्ये भाजपनं उमेदवार बदलला. मोदी लाटेत रणजीतसिंह नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या संजयमामा शिंदेंचा 85 हजार मतांनी पराभव केला. सध्या विधानसभेत राष्ट्रवादीचे 2, भाजपचे 2, शिवसेनेचा 1 आणि अपक्ष 1 असे सगळे महायुतीचे आमदार आहेत.
भाजपामध्ये पक्षांतर्गत मतभेद
माढामधून भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना (Ranjeetsingh Naik Nimbalkar) उमेदवारी दिलीय. त्यामुळं पक्षांतर्गत वाद उफाळून आलाय. धैर्यशील मोहिते पाटलांना (Dhairyasheel Mohite Patil) उमेदवारी नाकारल्यानं अकलूजच्या मोहिते पाटलांनी बंडाचं निशाण फडकावलंय. दुसरीकडं फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्याही विरोधाला धार आलीय. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी नाराजांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र धैर्यशील मोहिते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. महाविकास आघाडीनं अद्याप आपले पत्ते खोललेले केलेले नाहीत. माणमधील उद्योजक अभयसिंह जगताप राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे.
या मतदारसंघात मराठा समाजासोबत धनगर समाजाची लोकसंख्याही लक्षणीय आहे. त्यामुळं मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून इथली निवडणूक गाजण्याची शक्यता आहे. आरक्षणाचा मुद्दा उमेदवारांची डोकेदुखी वाढवू शकतो. पक्षांतर्गत नाराजीचा फटका रणजितसिंह नाईक निंबाळकरांना बसू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. मोहिते पाटील आपलं बंड कायम ठेवतात की तह करतात, यावर माढाचं जय-पराजयाचं गणित अवलंबून असणाराय. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच माढाचं राजकीय चित्र स्पष्ट होणाराय.