PM Modi Post on Lok Sabha Nivadnuk 2024 Phase 1 Voting: देशातील पहिल्या टप्प्यामधील मतदान आज पार पडत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये देशातील 21 राज्यांमधील 102 जागांसाठी मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सुरु झालं असून यात महाराष्ट्रातील 5 जागांचा समावेश आहे. विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान पंतप्रधान मोदींनी आज महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर अगदी मराठीमधून मतदारांना विशेष आवाहन केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळामध्येच आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन मराठीत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मतदारांना विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधांनी केलं आहे. "2024 च्या लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात! 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होत असल्याने, या जागांसाठी मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं असं मी आवाहन करतो. विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं मी आवाहन करतो. शेवटी, प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो," असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात! 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होत असल्याने, या जागांसाठी मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं असं मी आवाहन करतो. विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं…
— Narendra Modi (@narendramodi) April 19, 2024
मराठी बरोबरच पंतप्रधान मोदींनी हिंदी, इंग्रजीमध्येही आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी बंगली, तमीळसहीत इतरही प्रादेशिक भाषांमध्ये नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
आज नागपूरमधून निवडणूक लढणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबरोबरच एकूण पाच मतदारसंघांमध्ये विकास ठाकरे, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर यासारख्या मोठ्या नेत्यांचं भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 97.6 कोटी मतदार मतदानासाठी पात्र आहेत. एकूण 44 दिवस निवडणुकीचा कार्यक्रम पार पडणार असून त्यात 7 पट्ट्यांमध्ये मतदान होणार आहे. शेवटच्या टप्प्याचं मतदान 1 जून रोजी होणार असून मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्पा वगळता सर्वच टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे.