भाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !

Lok Sabha Election 2024 : आतापासून लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तसेच दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: May 31, 2023, 08:53 AM IST
भाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान ! title=

Lok Sabha Election 2024 :  पुढील वर्षी अर्थात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तसेच काँग्रेसकडूनही चाचपणी सुरु आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडूनही आढावा घेण्यात येत आहे. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली असून तसे नियोजन करण्यावर भर दिला आहे. त्याचवेळी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे. 

भाजपचा लोकसभेसाठी मेगा प्लान  

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने मेगा प्लान आखला आहे. भाजपचे 225 नेते देशभरात सभांचा धुरळा उडवणार आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसह राज्यातले महत्त्वाचे भाजप नेतेही सहभागी होणार आहे. मोदींच्या यात 12 सभा होणार आहेत.  मोदी सरकारची 9 वर्षातली कामगिरी ते जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत. सर्व मतदारसंघातल्या 80 कोटी जनतेपर्यंत पोहोचण्याचे भाजपचं टार्गेट आहे.

राष्ट्रवादीकडून उमेदवाराची चाचपणी

राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईत बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. यात लोकसभा मतदारसंघामधली सद्यस्थिती, उमेदवाराची चाचपणी, कोणत्या जागांवर राष्ट्रवादीने दावा करावा यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

कोल्हापूर, अहमदनगर, माढा, सातारा, परभणी, बीड, उस्मानाबाद, नाशिक आणि दिंडोरी या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. भाजपने लोकसभेच्या 40 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय. तेव्हा भाजपला रोखण्यासाठी आता राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे.

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी?

दरम्यान, राज्यात भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने जोर लावला आहे. लोकसभेच्या 48 जागा जिंकण्यासाठी व्युहरचना आखण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आणि विधानसभा पोटनिवडणुकीत आघाडीला चांगले यश मिळाले. त्यामुळे लोकसभेलाही एकत्रित निवडणूक लढविण्यावर आघाडीचा भर दिसून येत आहे. जो निवडणून येईल, त्यालाच उमेदवारी देण्याची तयारी महाविकास आघाडीने चालवली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे युती ?

तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे. कारण काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. एका दिवसाआधीच फडणवीसांनी राज ठाकरेंसोबत गुप्त बैठक घेतली होती. तेव्हा मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. येणाऱ्या काळात शिवसेना, भाजप आणि मनसे हे एकत्रितपणे मुंबई महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मविआसोबत दोन हात करण्यासाठी मनसे आता भाजप शिवसेनेला टाळी देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.