मायावतीही पंतप्रधान म्हणून चालतील पण शरद पवार नाही - आंबेडकर

आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-एनसीपीसाठी वंबुआ आव्हान ठरणार आहे

Updated: May 9, 2019, 12:41 PM IST
मायावतीही पंतप्रधान म्हणून चालतील पण शरद पवार नाही - आंबेडकर  title=

सोलापूर : महाराष्ट्रातील प्रमुख दलित नेत्यांपैंकी एक आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये इतर राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरली. आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-एनसीपीसाठी वंबुआ आव्हान ठरणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीनं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. 

विधानसभेत स्वतंत्रपणे सर्व जागा लढवणार

भाजप विरहित सत्ता स्थापन करण्यासाठी पंतप्रधान पदासाठी मायावती यांना पाठिंबा देऊ मात्र शरद पवारांना पंतप्रधान पदासाठी कट्टर विरोध असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. येणाऱ्या विधानसभेला वंचित बहुजन आघाडी आणि सहकारी पक्ष एआयएमआयएम महाराष्ट्रातील सर्व अर्थात २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. आपला पक्ष कुणाहीसोबत जाणार नाही, मात्र कुणालाही आपल्या पक्षासोबत यायचं असेल तर आपल्या पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले राहतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 

लोकसभेच्या पाचव्या आणि सातव्या टप्प्यात मोदींना सत्ता हातातून जातेय की काय, म्हणून आता निवडणुकीत मोदी वैयक्तिक टीका करत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय.

लोकसभा निवडणूक २०१९ साठी भूमिका

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर प्रश्न उभा राहिलाय. पक्षाकडून जातीच्या आधारावर मत विभागणीचा डाव मांडण्यात आला. उमेदवारांमध्ये धर समाजाचे सहा, बौद्ध समाजाचे चार, माळी समाजाचे तीन, वंजारी समाजाचे तीन, विश्वकर्मा समाजाचे तीन, मुस्लीम समाजाचे दोन, कुणबी समाजाचे २, भील्ल समाजाचे २ आणि मराठा, कोळी, माना आदिवासी, आगरी, मातंग, धिवर, वडार, होलार, शिंपी तसंच लिंगायत समाजातून प्रत्येकी एक-एक उमेदवार उभा करण्यात आलाय.