मुंबईतील मतदानाचा टक्का वाढला; ग्रामीण व आदिवासी मतदार शहरवासीयांपेक्षा ठरले सुजाण

मतदारांचा टक्का वाढल्याने कोणाला फटका बसणार?

Updated: Apr 29, 2019, 11:15 PM IST
मुंबईतील मतदानाचा टक्का वाढला; ग्रामीण व आदिवासी मतदार शहरवासीयांपेक्षा ठरले सुजाण title=

मुंबई: राज्यात सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यासाठीचे मतदान पार पडले. आजच्या टप्प्यात मुंबई व ठाण्यासह एकूण १७ लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ, शिर्डी आणि शिरुर या मतदारसंघांचाही समावेश आहे. राज्यात सरासरी ५७ टक्के मतदान झाले. राज्यातील एकूण ५ कोटी ३७ लाख नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत तब्बल ५४.५० टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याचा अंदाज आहे. विशेष गोष्ट ग्रामीण आणि आदिवासी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदूरबार, दिंडोरी आणि पालघरमधील मतदारांनी आपण शहरी लोकांपेक्षा सुजाण असल्याचे दाखवून दिले. नंदूरबारमध्ये सर्वाधिक ६७, दिंडोरीत ६३.५० आणि पालघरमध्ये ६१.३६ टक्के मतदान झाले. ही आकडेवारी अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. निवडणूक आय़ोगाने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, नाशिक आणि मावळमध्ये भरभरुन मतदान झाले. तर कल्याणमध्ये मतदारांनी निराशा केली. मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागात सेलिब्रेटींनी उत्साहात मतदान केले.

शिवसेनेच्यादृष्टीने मुंबईचा गड अत्यंत महत्त्वाचा असल्याने येथील सहा मतदारसंघात काय घडणार, याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. यापैकी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीमुळे सर्वाधिक चर्चेत असलेल्या उत्तर मुंबईत सर्वाधिक मतदान झाले.

मतदानाच्या एकूण आकडेवारीवर नजर टाकल्यास चौथ्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी २०१४च्या तुलनेत वाढली आहे. तर चार टप्प्यातील एकत्रित मतदानाची टक्केवारी ६१ टक्के इतकी आहे. दरम्यान, काही ठिकाणचा मतदानाचा वाढीव टक्का कोणाला धक्का देणार, याविषयी राजकीय वर्तुळाकडून आडाखे बांधायला सुरुवात झाली आहे. 

यानंतर देशभरात मतदानाचे आणखी तीन टप्पे शिल्लक आहेत. यामध्ये सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशकडे असेल. केंद्रात सत्तास्थापनेच्यादृष्टीने उत्तर प्रदेशची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे उर्वरित टप्प्यांमध्ये उत्तर प्रदेशातील महत्त्वपूर्ण मतदारसंघात कशाप्रकारे मतदान होणार, यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून असतील. २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे (अंदाजित आकडेवारी) 

पालघर- ६१.३६
धुळे- ५५.७५
नाशिक- ५४.५०
दिंडोरी- ६३.५०
कल्याण- ४२.८४
नंदूरबार- ६७
शिरूर- ५८.४
मावळ- ५८.२१
दिंडोरी- ६३.५०
शिर्डी- ५९.५०
मुंबई उत्तर- ५९.३२
मुंबई उत्तर पश्चिम- ५४.७१
मुंबई उत्तर पूर्व- ५६.३१
मुंबई उत्तर मध्य- ५२.८४
मुंबई दक्षिण मध्य- ५५.३५
दक्षिण मुंबई- ५२.१५
भिवंडी- ५२.४३
कल्याण- ४२.८४
ठाणे- ४८.५६