लातूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी फक्त मनोरंजनासाठीच बोलतात अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवलीय. लातूरमध्ये भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधलाय. राहुल गांधी यांची भाषणं आणि आश्वासनं काल्पनिक असतात, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. मोदींनी काळ्या पैशावर आघात केल्यामुळे तिजोरीत पैसे आले. त्यावर डोळा ठेवून गरिबांना ७२ हजार देण्याचा डाव काँग्रेसने आखलाय, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केलाय. तसंच देशात रामराज्य येणार असं सांगत लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.
Glimpses from my public meeting at Murud in Latur LokSabha Constituency this morning.#ModiAgainSaysIndia #LokSabhaElections2019 pic.twitter.com/pEdVAEtorD
— Chowkidar Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 13, 2019
यापूर्वी काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय. जनतेशी संवाद साधल्यानंतर हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचं राहुल गांधींनी म्हटलं होतं. 'न्याय' नावानं एक नवी योजना जाहीर गरिबांना प्रति वर्षी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेसने त्यांच्या घोषणापत्रात केली आहे. यावरच मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला. चंद्रपुरात झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी राफेल करार, गरिबी, बेरोजगारी या मुद्द्यांवरूनही मोदी सरकारवर टीका केली होती. मोदी हे देशाचे नाही तर श्रीमंत उद्योजकांचे चौकीदार आहेत, असेही राहुल म्हणत, १५ निवडक उद्योजकांचे कर्ज माफ करण्यास मोदी सरकारकडे पैसा आहे. मात्र. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या सरकारकडे पैसे नाहीत, अशी टीका राहुल गांधींनी मोदी सरकारवर केली होती.