बीड : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यात भाजपा विरुद्ध काम करणाऱ्या आमदार विनायक मेटे यांना गर्भित इशारा दिलाय. 'आले तर सोबत नाही तर स्वतंत्र' असं म्हणत त्यांनी मेटे यांचे नाव न घेता टीका केली. राज्यात भाजपा म्हणजे गोपीनाथ मुंडे, त्यांच्यासोबत जे होते त्यांना आम्ही आमच्यासोबत कायम ठेवलंय. मात्र, बीडमध्ये भाजपा विरोधात अन राज्यात सोबत हे चालणार नाही, यायचे तर सोबत या नाहीतर गरज नाही, जे येतील त्यांना सोबत घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जाऊ पण विजय नक्की मिळवू असं म्हणत फडणवीसांनी आपण भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे यांच्या पाठिशी ठाम असल्याचं स्पष्ट केलंय.
शुक्रवारी, बीड -भाजप सेना महायुतीसोबत राज्यात सत्तेत असणारे 'शिवसंग्राम'चे नेते विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या पारड्यात आपली ताकद टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून भाजप आणि विशेषतः पंकजा मुंडे यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत.
बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांचे राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणूक जाहीर होताच मेटे यांनी राज्यात महायुतीसोबत मात्र बीडमध्ये भाजप विरोधात अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मेटे यांना कानपिचक्या दिल्या होत्या. गेल्या पंधरा दिवसापासून मेटे आणि त्यांचे कार्यकर्ते शांत होते.
दरम्यान गुरुवारी बीड येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मेटे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवत 'लोकसभेत शिवसंग्रामच्या मावळ्यांनी राष्ट्रवादीला साथ द्यावी आणि पंकजा मुंडे यांची मस्ती जिरवावी' असा आदेश दिला होता.